World Cup 2023 IND vs ENG Match : एकदिवसीय विश्वचषक 2023 स्पर्धेच्या 29व्या सामन्यात भारताने 50 षटकांत नऊ गडी गमावून 229 धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडचा डाव 34.5 षटकांत 129 धावांत गारद झाला. महंमद शमी, जसप्रीत बुमराह व कुलदीप यादव यांच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारताने गतविजेत्या इंग्लंडचा 100 धावांनी पराभव केला.
लखनौच्या एकना स्टेडियमवर रविवारी (29 ऑक्टोबर) भारताने इंग्लंडविरुद्ध संस्मरणीय विजय मिळवला. त्यांनी20 वर्षांनंतर विश्वचषकात इंग्लंडचा पराभव केला. टीम इंडियाने 2003 मध्ये त्याच्याविरुद्ध शेवटचा विजय मिळवला होता. त्यानंतर 2011 मध्ये बंगळुरूमध्ये दोन्ही संघांमधील सामना बरोबरीत सुटला होता. त्याच वेळी, 2019 मध्ये भारतीय संघ बर्मिंगहॅममध्ये पराभूत झाला.
टीम इंडियाने या स्पर्धेत सलग सहावा विजय मिळवला. यासह गुणतालिकेत 12 गुणांसह अव्वलस्थानही प्राप्त केले आहे. त्याचबरोबर इंग्लंडचा सहा सामन्यांमधला हा पाचवा पराभव आहे. त्यांचा संघ 2 गुणांसह शेवटच्या स्थानी आहे. भारतीय संघ आता उपांत्य फेरी गाठण्याच्या जवळ आहे. त्याचवेळी इंग्लंडचा संघ स्पर्धेतून बाहेर होण्याच्या मार्गावर आहे.
इंग्लंडच्या नावे लाजीरवाणा विक्रम…
इंग्लंड संघाने विश्वचषकाच्या इतिहासात एक लाजिरवाणा विक्रम केला आहे. विश्वचषकात इंग्लंड संघ सलग चार सामने हरले आहेत तसेच विश्वचषकाच्या इतिहासात दुसऱ्यांदा एखादा गतविजेता संघ सलग चार सामने हरला आहे. इंग्लंडपूर्वी ऑस्ट्रेलियाने 1992 मध्ये सलग चार सामने गमावले होते. 1987 मध्ये विश्वचषक जिंकल्यानंतर त्यांनी गतविजेते म्हणून प्रवेश केला होता.
भारताचा विश्वचषकातील 59 वा विजय
विश्वचषकात भारताचा हा एकूण 59 वा विजय आहे. या स्पर्धेच्या इतिहासातील सर्वाधिक विजयांच्या बाबतीत त्याने न्यूझीलंडला मागे सोडले. न्यूझीलंडने 58 सामने जिंकले आहेत. आता फक्त ऑस्ट्रेलिया भारताच्या पुढे आहे. त्याने 73 सामने जिंकले आहेत.