नवी दिल्ली – इस्रायलच्या (Israel ) लढाऊ विमानांनी आज पहाटेच्या सुमारास गाझामधील (gaza) सर्वात मोठ्या रुग्णालयाजवळ जोरदार बॉम्बफेक केली. या रुग्णालयामध्ये रुग्ण आणि हजारो पॅलेस्टिनींनी आश्रय घेतला होता, असे स्थानिक रहिवाशांनी सांगितले. मात्र हमासच्या (Hamas) दहशतवाद्यांनी या रुग्णालयाच्या खाली एक कमांड पोसट केले असल्याचा आरोप इस्रायलने केला आहे. मात्र आपल्या दाव्याच्या समर्थनार्थ इस्रायलने कोणताही पुरावा दिला नाही.
शिफा रुग्णालयाजवळ बॉम्बफेक केल्याबद्दल इस्रायलच्या सैन्यदलाकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.इस्रायलचे पंतप्रधान बेन्जामिन नेतान्याहू यांनी कालच हमासविरुद्धच्या युद्धाचा दुसरा टप्पा सुरू झाल्याचे जाहीर केले आहे. गेल्या दोन दिवसांपासून गाझाच्या हद्दीमध्ये इस्रायलचे रणगाडे आणि चिलखती वाहने घुसवली जाऊ लागली आहेत. एकाच वेळी हवेतून, जमिनीवरून आणि समुद्रातूनही गाझामध्ये मारा केला जाऊ लागला आहे. शुक्रवारी इस्रायलने केलेल्या माऱ्यामध्ये गाझामधील दूरसंचार यंत्रणा उद्ध्वस्त झाली आहे. त्यामुळे नाकाबंदी झालेल्या 2.3 दशलक्ष पॅलेस्टिनींचा बाह्य जगाशी संपर्क तुटला होता. आज सकाळी बहुसंख्य ठिकाणची दूरसंचार यंत्रणा पूर्ववत झाली. (Israel war)
इस्रायलच्या सूचनेनुसार हजारो जण दक्षिणेकडे निघून गेले आहेत. मात्र अजूनही शेकडो जण उत्तरेकडेच राहिले आहेत, असे इस्रायलने म्हटले आहे. सुरक्षित ठिकाणांवर मारा केल्यानंतर इस्रायलने हे स्पष्टीकरण दिले आहे. इस्रायलचे हल्ले सुरू असतानाही हमासकडूनही इस्रायलवर रॉकेटचा मारा केला जातोच आहे. युद्ध सुरू झाल्यापासून गाझामधील पॅलेस्टिनींच्या मृत्यूची संख्या 7,700 इतकी झाली आहे. इमारतींच्या ढिगाऱ्यांखाली 1,700 जण अडकून पडल्याचा संशय आहे.
पॅलेस्टिनींनी अन्नासाठी गोदामे फोडली
इस्रायलच्या माऱ्यामुळे गाझामध्ये निर्माण झालेल्या अनागोंदीबद्दल पॅलेस्टिनींसाठीच्या संयुक्त राष्ट्राच्या एजन्सीने चिंता व्यक्त केली आहे. खाद्यपदार्थ आणि अन्य किमान आवश्यक वस्तू मिळवण्यासाठी हजारो पॅलेस्टिनींनी गाझामधील गोदामे फोडली आहेत, असे या एजन्सीचे संचालक थॉमस व्हाईट यांनी सांगितले. गोदामे फोडली जाणे हे सार्वजनिक व्यवस्था उद्ध्वस्त झाल्याचे लक्षण आहे, असे ते म्हणाले. गाझामधील शेकडो शाळा आता आश्रय छावण्या केल्या गेल्या आहेत. हवाई हल्ल्यामुळे गाझाच्या उत्तरेकडील शिफा रुग्णालयाकडे जाणारे रस्तेही उद्ध्वस्त झाले आहेत.
बोगद्यांबद्दल फारशी माहिती नाही
काही दिवसांपूर्वी या रुग्णालयाजवळ हमासच्या दहशतवाद्यांचे भूमिगत तळ असल्याचे इस्रायलने कॉम्प्युटराइज्ड इमेजेसच्या हवाल्याने म्हटले होते. हमासच्या बोगदे आणि इतर पायाभूत सुविधांबद्दल फारसे माहिती नाही आणि दाव्यांची स्वतंत्रपणे पडताळणी होऊ शकली नाही. हमासच्या सरकारने हे आरोप खोटे असल्याचे सांगून फेटाळून लावले होते. या सुविधेवर हल्ला करण्यासाठी त्यांनी इस्रायलला जबाबदार धरले आहे.