पुणे – सणासुदीच्या काळात दरवर्षी खाजगी लक्झरी बस धारकांकडून नेहमीच्या भाड्यापेक्षा अव्वाच्या सव्वा वाढीव भाड्याची आकारणी करण्यात येते व प्रवासी नागरिकांना वेठीस धरण्यात येते.
या खाजगी लक्झरी बस गाड्यांच्या तपासणीसाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय पुणे (आरटीओ पुणे) व वाहतूक शाखा पुणे शहर यांच्यावतीने त्यांना अधिक तपासणी पथके नेमण्यात यावीत.
तसेच नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी कॉंग्रेस पक्षाकडून आरटीओकडे करण्यात आली आहे. कॉंग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाच्या वतीने आज ज्येष्ठ नेते मोहन जोशी यांनी आ प्रादेशिक परिवहन अधिकारी (प्रभारी) संजीव भोर यांच्याकडे निवेदन दिले आहे.
समृद्धी एक्सप्रेस हायवे वर झालेले खाजगी बस च्या अपघातांची संख्या लक्षात घेता व त्यात मरण पावलेल्या प्रवाशांची संख्या लक्षात घेता आरटीओने सणासुदीच्या निमित्ताने अधिक विशेष तपासणी पथके नेमून खाजगी लक्झरी बस गाड्यांची कडक तपासणी करण्यात यावी असे निवेदनात म्हटले आहे.
यामुळे सणासुदीनिमित्त प्रवासी नागरिकांना वेठीस ठेवणे त्यांच्याकडून अधिकच्या भाड्याची मागणी करणे या गोष्टीला सुद्धा चाप बसणार आहे. तसेच तपासणी पथके नेमल्यामुळे खाजगी लक्झरी बसचे वाहनाचे स्पीड सुद्धा तपासणी शक्य होणार आहे.
रमेशचंद्र बागवे (अध्यक्ष कॉंग्रेस पक्ष ), ज्येष्ठ नेते मोहन जोशी यांचे निवेदन प्रादेशिक परिवहन अधिकारी(प्रभारी) संजीव भोर यांनी स्विकारले. यावेळी युवराज पाटील सहाय्यक परिवहन अधिकारी युवराज पाटील , सुजित डोंगर जाळ उपस्थित होते.