मुंबई – बॉलिवूडची पंगाक्वीन म्हणून ओळख असलेली अभिनेत्री कंगना राणावतचा ‘टीकू वेड्स शेरू’ हा सिनेमा चर्चेत आहे. या सिनेमाची निर्मिती कंगनाने केली आहे. त्यानंतर आता कंगणाने नव्या सिनेमाची घोषणा केली आहे. तर तिचा मित्र संदीप सिंह या सिनेमाची निर्मिती करणार असल्याचे तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत सांगितले आहे.
कंगना इनस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत लिहिले की, “संदीप आणि मी एकमेकांचे चांगले मित्र असून गेल्या 13 वर्षांपासून आमची खूप घट्ट मैत्री आहे. एकत्र काम करण्यासाठी आता आम्हाला एक चांगला विषय आणि पात्र मिळालं आहे. लवकरच आमच्या आगामी सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे. हा माझ्या आतापर्यंतच्या करिअरमधला एक बिग बजेट सिनेमा आहे. या सिनेमातील माझं पात्र खूप हटके असणार आहे. या सिनेमासंदर्भात आणखी अपडेट्स देत राहू”.
परंतु, अद्याप या सिनेमाचं नाव आणि चित्रपट कोण दिग्दर्शित करणार याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. तर दुसरीकडे, संदीप सिंहने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करत लिहिले की, “राष्ट्रीय पुरस्कार विजेती आणि पद्मश्री पुरस्काराने सन्मानित झालेल्या कंगनासोबत काम करणं म्हणजे स्वप्न साकार होण्यासारखं आहे. गेल्या एका दशकापासून मी त्यांच्यासोबत काम करण्यासाठी उत्सुक आहे.” सध्या कंगणाच्या या आगामी चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.
काही दिवसांपूर्वीच कंगणाच्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटाचा टीजर रिलीज झाला आहे. या सिनेमात कंगणा इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. हा सिनेमा २४ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.