बर्मिंगहॅम -जागतिक कसोटी क्षेत्रात सर्वात मानाची समजली जात असलेली ऍशेस कसोटी मालिका आजपासून रंगणार आहे. बर्मिंगहॅमला या मालिकेतील पहिल्या कसोटीने आज सुरुवात होत आहे.
भारतीय संघाला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम लढतीत पराभूत केल्यानंतर भरात असलेल्या ऑस्ट्रेलिया संघाचेच पारडे याही मालिकेत जड राहणार आहे. मात्र, मायदेशात खेळण्याचा लाभ इंग्लंडला मिळेल, असेही चित्र आहे. या दोन संघातील ही मालिका सर्वात रोमांचक होत असते व त्यात पराभूत झालेल्या संघावर त्यांच्या देशाची जनता जणू विश्वकरंडक गमावल्याप्रमाणे संताप व्यक्त करताना दिसते.
1982 साली या दोन संघात खेळवण्यात आलेल्या कसोटी मालिकेत इंग्लंडचा संघ पराभूत झाल्यावर त्यांनी आपापल्या बॅट व स्टम्प यांची राखरांगोळी केली. तीच राख आत एका छोट्या करंडकात ठेवली जाते व तोच करंडक प्रत्येक वेळी विजेत्या संघाला ऍशेस म्हणून देण्यात येतो.
दुखापतीतून परतलेला जॉनी बेअरस्टो, जोफ्रा आर्चर व कर्णधार बेन स्टोक्समुळे इंग्लंडची बाजू भक्कम मानली जात असली तरीही या मालिकेचा इतिहास पाहता ऑस्ट्रेलियानेच वर्चस्व गाजवलेले आहे. आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला इंग्लंडचा अष्टपैलू मोईन अलीदेखील निवृत्तीचा निर्णय मागे घेत संघात परतला आहे. त्यातच कर्णधार बेन स्टोक्स व प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलम यांच्या जोडीगोळीचे वर्णन बझबॉल असे केले गेल्याने गेल्या दोन वर्षांपासून ऍशेस मालिका जास्त रंगतदार ठरत आहे.
या जोडगोळीने गेल्या 17 पैकी 12 कसोटी जिंकल्या असून आता ऍशेसही पटकावण्याच्या इराद्याने ते मैदानात उतरणार आहेत. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाची मानसिकता अत्यंत सकारात्मक आहे. भारतीय संघाविरुद्धची अंतिम कसोटी जिंकल्यामुळे तसेच इंग्लंडमधील वातावरणात त्यांची फलंदाजी व गोलंदाजीही सरस ठरल्यामुळे त्यांचेच पारडे या मालिकेत जड राहणार आहे.
इंग्लंडमधील लहरी हवामानाचा अनुभव सध्याच्या ऑस्ट्रेलिया संघातील बहुतांशी खेळाडूंना असल्याने हि मालिका एकतर्फी निश्चितच होणार नाही. ऑस्ट्रेलिया संघातील अनेक खेळाडूंनी काऊंटी क्रिकेटही खेळले असल्याने त्यांनाही वातावरणाचा अतिरिक्त लाभ होणार आहे. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाच्या भक्कम फलंदाजीला रोखण्याचे आव्हान यजमान इंग्लंडसमोर राहिल.
ऍशेस मालिकेचे वेळापत्रक
पहिली कसोटी 16 ते 20 जून, एजबस्टन (बर्मिंगहॅम)
दुसरी कसोटी 28 जून ते 2 जुलै, लॉर्डस (लंडन)
तिसरी कसोटी 6 जुलै ते 10 जुलै, हडिंग्ले (लिड्स)
चौथी कसोटी 19 ते 23 जुलै, ओल्ड ट्रॅफर्ड (मॅंचेस्टर)
पाचवी कसोटी 27 ते 31 जुलै ओव्हल (लंडन)
(भारतात सोनी स्पोर्टस 5 वर)
(सर्व सामने भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 3.30 पासून)