नवी दिल्ली – आज दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 25 वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त दिल्लीत आयोजित कार्यक्रमात बोलताना शरद पवारांनी मोठी घोषणा केली. सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावर पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे. यासोबतच पक्षातील इतर काही नेत्यांवर अतिरिक्त जबाबदारी सोपवण्याचीही घोषणा यावेळी पवारांनी केली आहे. मात्र, यामध्ये अजित पवार यांचे नाव नसल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
यावेळी शरद पवार यांनी प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांच्यावर कार्यकारी अध्यक्ष पदाची जबाबदारी दिली. तसेच खासदार सुनिल तटकरे, डॉ. योगनानंद शास्त्री, के.के. शर्मा, पी.पी. महोम्मद फैजल, नरेंद्र वर्मा, जितेंद्र आव्हाड, एस. आर. कोहली, नसीम सिद्दकी या सहकाऱ्यांना पक्षांतर्गत विविध महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. परंतु अजित पवार यांच्यांवर सध्यातरी कोणतीही जबाबदारी दिली नाही.
दरम्यान, शरद पवरांच्या या घोषणेनंतर माध्यमांनी अजित पवार यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता. यावेळी मात्र, अजित पवार यांनी माध्यमांशी कुठलाही संवाद न साधता तेथून निघून गेले. तसेच शरद पवार यांच्या घोषणेनंतर पक्षाच्या झालेल्या बैठकीत ते नव्हते. यामुळे ते नाराज आहे का? यासंदर्भात चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
मात्र, त्यानंतर अजित पवार यांनी ट्विट करत या प्रकरणाबद्दल आपली भावना व्यक्त केली आहे. ट्विटमध्ये अजित पवार म्हणाले की, “राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनी आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली खासदार प्रफुल्लभाई पटेल आणि खासदार सुप्रियाताई सुळे यांची पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २४ व्या वर्धापन दिनी आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली खासदार प्रफुल्लभाई पटेल आणि खासदार सुप्रियाताई सुळे यांची पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड करण्यात आली. तसंच खासदार प्रफुल्लभाई पटेल, खासदार सुप्रियाताई सुळे, खासदार सुनिल…
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) June 10, 2023
तसंच खासदार प्रफुल्लभाई पटेल, खासदार सुप्रियाताई सुळे, खासदार सुनिल तटकरे, डॉ. योगनानंद शास्त्री, के.के. शर्मा, पी.पी. महोम्मद फैजल, नरेंद्र वर्मा, जितेंद्र आव्हाड, एस. आर. कोहली, नसीम सिद्दकी या सहकाऱ्यांना पक्षांतर्गत विविध महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत.
या सर्व सहकाऱ्यांचे मन:पूर्वक अभिनंदन…! आदरणीय साहेबांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरवत दिलेल्या जबाबदाऱ्या सर्व सहकारी यशस्वीपणे पार पाडतील, असा विश्वास आहे. आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली ‘हृदयात महाराष्ट्र… नजरे समोर राष्ट्र…’
हा विचार घेऊन रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देशाच्या आणि राज्याच्या जडण-घडणीत मोलाचं योगदान देईल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्ता, पदाधिकारी याच ध्येयानं कामं करतील हा विश्वास आहे. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचं पुन:श्च अभिनंदन..! अशी भावना अजित पवार यांनी व्यक्त केली आहे.