Odisha Train Accident : ओडिशा रेल्वे अपघातानंतर देशभरात एकच खळबळ उडाली आहे. या दुर्घटनेत 288 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर 900 हून अधिक जण जखमी झाले आहे. अद्यापही घटनास्थळी वेगाने बचाव कार्य सुरू आहे. शुक्रवारी सायंकाळी झालेल्या या अपघातानंतर मोठाआवाज झाला होता. त्यानंतर तेथील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत तातडीने मदत कार्य सुरु केले. तसेच ओडीशामध्ये जखमींना वाचवण्यासाठी रक्ताची गरज असल्याने मोठ्या संख्येने रक्तदान करण्यासाठी हॉस्पिटलबाहेर लोकांच्या रांगा लागल्याचा व्हिडिओही समोर आला होता.
जखमींसाठी अचानक रक्ताची मागणी वाढणार हे ओळखून स्थानिक लोकांनी रात्रीच मदतीसाठी पुढाकार घेतला होता. रक्तदान करण्यासाठी लोक स्वत:हून हॉस्पिटलमध्ये पोहोचले. बालासोरमध्ये तर एका रात्रीत ५०० युनिट रक्त जमा झाल्याचे सांगण्यात आले यह. रात्रीपर्यंत रक्तदानासाठी लोकांची मोठी रांग लागली होती. अनेक लोक ४ तास या रांगेत उभे होते. जखमींना मदत करण्यासाठी रात्री बालासोर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये दाेन हजाराहून अधिक लोक जमले आणि अनेकांनी रक्तदानही केले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. ओडिशातील नागरिकांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक करण्यात आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील रेल्वे अपघात झाल्यानंतर स्थानिक नागरिकांनी पुढे येऊन बचावकार्यास सुरुवात केल्याबद्दल त्यांचे आभार मानले. अपघातानंतर आजूबाजूचे लोक पळत सुटले आणि बचावासाठी पुढे आले. लष्कराचे जवान, एनडीआरएफ, एसडीआरएफ, राज्य पोलीस दल या सर्वांनी लोकांना बाहेर काढण्यास सुरुवात केली. गणेश नावाच्या तरुणाने देखील घटनास्थळी धाव घेत २०० ते ३०० जणांचे प्राण वाचवले.
आर्थिक मदत जाहीर
या घटनेनंतर मृतांच्या वारसांना रेल्वे मंत्रालयाकडून १० लाखांची, गंभीर जखमींना दोन लाख तर किरकोळ जखमींना प्रत्येकी ५० हजारांची मदत जाहीर झाली. त्याशिवाय पंतप्रधान साहाय्यता निधीतून मृतांच्या वारसांना दोन लाख, तर जखमींना प्रत्येकी ५० हजारांची मदत जाहीर करण्यात आली.
कसा घडला अपघात ?
कोरोमंडल एक्स्प्रेसने रेल्वेमार्गाच्या लूप लाइनमध्ये शुक्रवारी संध्याकाळी ६.५० वा. प्रवेश केल्यानंतर तिथे उभ्या मालगाडीला जोरदार धडक दिली. कोरोमंडल ताशी १२८ किमी वेगाने धावत होती. तिने मालगाडीला जोरदार धडक दिल्याने या गाडीचे डबे रुळावरून घसरले. त्याचवेळी विरुद्ध दिशेने येणारी बेंगळुरू-हावडा एक्स्प्रेस ताशी ११६ किमी वेगाने कोरोमंडल एक्स्प्रेसच्या रुळांवरून घसरलेल्या डब्यांवर धडकली.