सिंदखेडराजा – समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. ही दुर्घटना आज पहाटेच्या सुमारास घडली आहे. या घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे.
समृद्धी महामार्गावर सिंदखेडराजा नजीक असलेल्या दुसरबीड जवळ मेहकरकडून छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने जाणारी कार दुभाजकाला धडकली आणि कारने अचानक पेट घेतला.
मिळालेल्या माहितीनुसार, मेहकरकडून मुंबई कॅरिडॉरच्या दिशेने जात असताना दुसरबीड गावानजीक आल्यानंतर कार रस्त्याच्या दुभाजकावर धडकली. त्यानंतर कारने अचानक पेट घेतला . त्यावेळी गाडीत तीन प्रवासी होते. त्यातील दोन प्रवाशांचा जागीच होरपळून मृत्यू झाला. एक व्यक्ती गंभीर जखमी असून त्याच्यावर मेहकर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या घटनेची माहिती महामार्ग पोलिसांनी मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर जखमी अजय भिलाला या तरुणास तत्काळ रुग्णवाहिकेद्वारे मेहकर ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. तर मृत पावलेल्या दोघांचे पार्थिव रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहे. हा अपघात झाल्यानंतर क्रेनच्या साहाय्याने वाहन बाजूला करण्यात आले आणि त्यानंतर वाहतूक कोंडी सुरळीत करण्यात आली.