गुजरात टायटन्सने शानदार फलंदाजी करताना 20 षटकांत 4 गडी गमावून 214 धावा केल्या आहेत. आयपीएल फायनलमधील ही सर्वात मोठी धावसंख्या आहे. यापूर्वी 2016 मध्ये सनरायझर्स हैदराबादने 20 षटकांत 7 बाद 208 धावा केल्या होत्या. चेन्नईला पाचव्यांदा आयपीएल चॅम्पियन बनण्यासाठी विक्रमी म्हणजेच 215 धावांचा पाठलाग करावा लागणार आहे. यापूर्वी आयपीएल फायनलमध्ये 200 धावांचा पाठलाग फक्त एकदाच झाला होता. 2014 साली कोलकाताने फायनलमध्ये पंजाबसमोर 200 धावांचे आव्हान ठेवले होते. यापेक्षा जास्त धावांचा पाठलाग कधीच केला गेला नाही.
नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या गुजरातची सुरुवात चांगली झाली. वृद्धिमान साहा आणि शुभमन गिल यांनी पहिल्या विकेटसाठी 67 धावांची भागीदारी केली. शुभमनला सातव्या षटकात महेंद्रसिंग धोनीने रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीवर यष्टिचित केले. त्याने 20 चेंडूत 39 धावा केल्या. यामध्ये सात चौकारांचा समावेश आहे. यानंतर ऋद्धिमान साहा आणि साई सुदर्शन यांनी दुसऱ्या विकेटसाठी 64 धावांची भागीदारी केली. दरम्यान, साहाने आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याला दीपक चहरने धोनीच्या हाती झेलबाद केले. साहा 39 चेंडूंत पाच चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 54 धावा करून बाद झाला.
यानंतर सुदर्शन आणि कर्णधार हार्दिकने तिसऱ्या विकेटसाठी 110 धावांची भागीदारी केली. सुदर्शनने अंतिम सामन्यात चमकदार कामगिरी करत 47 चेंडूत 96 धावा केल्या. आयपीएल 2023 मधील हे त्याचे तिसरे अर्धशतक होते. सुदर्शनचे शतक 4 धावांनी हुकले. 20व्या षटकात मथिशा पाथिरानाने त्याला एलबीडब्ल्यू आऊट केले. सुदर्शनने 47 चेंडूत आठ चौकार आणि सहा षटकारांच्या मदतीने 96 धावांची खेळी केली.
डावाच्या शेवटच्या चेंडूवर रशीदला पाथीराना ऋतुराज गायकवाडने झेलबाद केले. त्याला खातेही उघडता आले नाही. हार्दिकने 12 चेंडूत दोन षटकारांच्या मदतीने नाबाद 21 धावा केल्या.
चेन्नईकडून पाथीरानाने दोन विकेट घेतल्या. त्याचवेळी दीपक चहर आणि जडेजा यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली. तुषार देशपांडे चांगलाच महागात पडला. त्याने चार षटकात 56 धावा लुटल्या.