लोकसंख्या 33 कोटी. बंदुकांची संख्या 40 कोटी. घराघरात बंदूक. मोबाइलचं नवं मॉडेल बाजारात आलं म्हणून जुना तसाच ठेवून नवा घ्यावा, तितक्या सहजतेनं माणसं बंदुकांची नवनवीन मॉडेल खरेदी करतात. शांततेच्या बाबतीत “जगाचा रखवालदार’ म्हणून मिरवणाऱ्या अमेरिकेत ही अवस्था. बंदूक खरेदी करायला परवाना लागत नाही आणि वापरायला कारण लागत नाही. बिघडलं मानसिक संतुलन… मार गोळ्या! आणि मानसिक संतुलन बिघडवण्याची सोय सामाजिक आणि आर्थिक व्यवस्थेनं करून ठेवलेली! मग एखाद्या दिवशी 18 वर्षांचा एखादा मुलगा आपल्या कुटुंबाला घरात कोंडून ठेवतो.
एखादा नातेवाईक दार ठोठावतो. 18 वर्षांचा मुलगा दार उघडून त्यालाच जीवे मारण्याची धमकी देऊन पुन्हा दार लावतो. मुलानं कुटुंबियांना कोंडून ठेवल्याचं नातेवाईकाला समजतं. तो पोलिसांना खबर देतो; पण पोलीस यायच्या आत पोरानं आपले आईवडील, थोरली बहीण आणि धाकटा भाऊ यांना गोळ्या घालून ठार केलेलं असतं. आपले कुटुंबिय “नरभक्षक’ आहेत, असं त्या मुलाला वाटू लागलेलं असतं. ते आपल्याला मारून खाणार आहेत, अशी भीती त्याला उगीचच वाटू लागलेली असते आणि त्यातून तो संपूर्ण कुटुंबाला संपवतो. सीझर नावाच्या त्या खुनी पोराला पोलीस ताब्यात घेतात आणि एका हसऱ्या, मेहनती कुटुंबाची कहाणी खतम होते. टेक्सास प्रांतातल्या नॅस शहरात घडलेल्या या घटनेनं लोक हादरतात आणि पुन्हा सवयीनं आपापल्या कामात गुंततात.
अमेरिकेतली ही काही पहिलीच घटना नव्हे. गेल्याच वर्षी मे महिन्यात एका बंदूकधाऱ्यानं प्राथमिक शाळेत घुसून अंदाधुंद गोळीबार केला होता. दोन शिक्षक आणि 19 कोवळ्या पोरांचा बळी या घटनेत गेला होता. 2012 मध्ये न्यूटाउन कनेक्टिकटमध्येही अशीच घटना घडून 20 चिमुकल्यांसह सहा प्रौढांचा बळी गेला होता. याच वर्षी पहिल्या चार महिन्यांत गर्दीत घुसून गोळीबार करण्याच्या 200 पेक्षा अधिक घटना अमेरिकेत घडल्या. गेल्या 16 वर्षांची आकडेवारी काढली तर गोळीबारांच्या 556 गुन्ह्यांची नोंद आढळते. या घटनांमध्ये जवळजवळ 2900 लोकांना जीव गमवावा लागलाय.
नागरिकांकडील खासगी बंदुकांची जगभरातील संख्या आहे 85 कोटी आणि त्यातल्या 46 टक्के म्हणजे जवळजवळ 40 कोटी बंदुका एकट्या अमेरिकेच्या नागरिकांकडे आहेत. अमेरिकेतली “गन लॉबी’ नेहमीच चर्चेचा विषय ठरलीये; पण रिपब्लिकन असो वा डेमोक्रॅटिक, या दोन्ही पक्षांना या लॉबीवर नियंत्रण आणणं जमलेलं नाही. प्रत्येक गोष्ट “बाजार’ या एकाच शब्दात मोजायची सवय जगाला लावणाऱ्या अमेरिकेत बंदुकांचा “बाजार’ जवळजवळ 65 हजार विक्रेते सांभाळतात आणि हजारो कोटी रुपयांची “उलाढाल’ घडवून सगळे मालामाल झालेत.
कोणत्याही गोष्टीत एकदा पैशांचा बाजार सुरू झाला, की त्या गोष्टीच्या समर्थनार्थ “लॉजिक’ आपोआप विकसित होतं. अमेरिकेतल्या गन लॉबीने मध्यंतरी असा दावा केला होता की, जितक्या जास्त बंदुका विकल्या जातील, तितकी देशात शांतता नांदेल. कारण प्रत्येकाकडे बंदूक असेल तर सगळेच एकमेकांना घाबरून शांत राहतील. हे “लॉजिक’ अनेकांना पटलंही असेल; पण ते मांडताना एकाच गोष्टीचा विसर संबंधितांना पडला. एखाद्या पोराला आपलेच कुटुंबीय अचानक “नरभक्षक’ वाटू लागले, तर काय करायचं?
हिमाशूं