पुणे -विमान कंपन्यांकडून पुरवण्यात येणारी सेवा, या क्षेत्राला सरकारकडून मिळणारे प्रोत्साहन पाहता हवाई प्रवासी क्षेत्र करोना काळापूर्वीपेक्षा अधिक वेगाने “झेप’ घेत आहे. याबाबतची आकडेवारी नुकतीच समोर आली आहे. त्यामुळे विमान उड्डाण क्षेत्र पूर्वपदावर आल्याची सुचिन्हे आहेत.
गेल्या महिन्यातील म्हणजेच एप्रिल-2023 चा देशांर्तगत (डोमेस्टिक) हवाई वाहतूक क्षेत्राचा अहवाल महासंचालनालयाने काही दिवसांपूर्वीच जाहीर केला आहे. एप्रिल 2019 मध्ये डोमेस्टिक फ्लाइट पॅसेंजर्सची संख्या 1 कोटी 10 लाख होती. ती यंदा एप्रिलमध्ये तब्बल 22 टक्क्यांनी वाढल्याचे समोर आले आहे. ही संख्या आता 1 कोटी 28 लाखांवर पोहोचली आहे. परंतु, मार्च-2023 च्या तुलनेत ती काहीशी कमी आहे. जानेवारी ते एप्रिल या कालावधीतील एकूण विमान प्रवाशांची संख्या 5 कोटी 3 लाखांवर पोहोचली आहे. हे प्रमाण गेल्यावर्षीच्या याच काळाच्या तुलनेत तब्बल 42.88 टक्क्यांनी अधिक आहे.
“उडान’ योजनेचा हातभार
सामान्य नागरिकांना सहजतेने विमान प्रवास करता येण्यासाठी केंद्र सरकारने सन 2016 मध्ये “उडान’ योजना सुरू केली होती. त्यामुळे हे क्षेत्र हळूहळू विस्तारत असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे. हे अभियान 10 वर्षांसाठी असेल. दूरवरच्या भागांना हवाई प्रवास क्षेत्राशी जोडणे हा योजनेचा मुख्य उद्देश आहे. यासोबतच छोट्या शहरांपर्यंतही संपर्क वाढवणे हेदेखील अभियानाचे उद्दिष्ट आहे. या योजनेअंतर्गत 2024 पर्यंत 100 विमानतळ विकसित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.