बारामती तालुक्यात सुरू असलेले अवैध धंदे बंद करण्याचे दिले पोलिसांना आदेश
डोर्लेवाडी : बारामती तालुक्यात अवैध व्यवसाय बंद दाखवा आणि एक लाख रुपये बक्षीस मिळवा या मताळ्याखाली प्रभातने 14 तारखेला बातमी प्रसिद्ध केली होती या बातमीची दखल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी घेतली आहे. ते रविवारी बारामती दौऱ्यावर होते यावेळी पाहुणेवाडी या ठिकाणी राष्ट्रवादी संपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी आल्यानंतर त्यांनी बारामती तालुक्यात सुरू असलेल्या अवैध धंद्याबाबत बारामती पोलिसांना चांगलेच सुनावले आहे. माझी दारूची भट्टी असली तरी मला पकडा आणि टायर मध्ये घाला, अशा शब्दात विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी बारामती तालुक्यात सुरू असलेल्या अवैध धंद्याबाबत नाराजी व्यक्त करीत बारामती तालुक्यात सुरू असलेले अवैध धंदे बंद करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत.
पवार बारामती दौऱ्यावर असताना पाहुणेवाडी येथे ग्रामस्थांनी भाषण सुरू असताना पवार यांना अवैध धंद्याबाबत पत्र दिले. हे पत्र भर सभेत अजित पवार यांनी वाचून दाखवले. ते म्हणाले, आता शरद पवार, सुप्रिया सुळे आणि अजित पवार आम्ही येतो दारूच्या भट्ट्या शोधत बसतो. पोलिस निवांत पगार घेतील. तुम्हाला तर मी सॅल्यूटच करतो. मी कितीतरी वेळा सांगतो माझा यामध्ये काही हस्तक्षेप नसतो, असे अजित पवार म्हणाले.
यावेळी त्यांनी ग्रामस्थांनी दिलेले पत्र भर सभेमध्ये वाचून दाखवले. पुणे ग्रामीण व माळेगाव पोलीस ठाणे यांना दारूबंदी होण्याबाबत पत्रव्यवहार केला होता मात्र त्यांनी दखल केली घेतली नाही. असे या पत्रामध्ये नमूद करण्यात आले होते. यावेळी अजित पवार यांनी ग्रामस्थांच्या मागणीचे पत्र पोलीस अधिकाऱ्यांच्या हातात देत सह्यांचा कागद मात्र मी माझ्याकडे ठेवतो नाहीतर हे पत्र मला कोणी दिलेत त्यांच्या मागे तुम्ही लागाल, अशा शब्दांमध्ये पोलिसांची भंबेरी उडवली.
ते पुढे म्हणाले, पुढच्या वेळी कोणी पाहुणेवाडीचे मला भेटले तर आवर्जून सांगा की दादा तुम्ही सांगितल्यानंतर पोलिसांनी दारूबंदीसाठी पावले उचलली. उद्या माझी जरी भट्टी सापडली तरी मला पकडा आणि टायर मध्ये घाला, असे पवार म्हणताच सभेमध्ये एकच हशा पिकला.
ग्रामस्थांकडून दारू बंदीचे निवदेन बारामती तालुक्यातील पाहुणेवाडी सह, सांगवी, घाडगेवाडी, निरावागज, सोनगाव, मेखळी, झारगडवाडी, पिंपळी गावात राजरोजपणे रात्रंदिवस अवैध दारूचे धंदे सुरू आहेत. वरील गावातील दारूपाई अनेक घरे उध्वस्त झाली आहेत. अनेक कुटुंबातील मुले पोरकी झाली आहेत, दारुमुळे अनेक गावात तंटा निर्माण होऊन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न देखील गंभीर बनत चालला आहे. ग्रामसभेत अनेकदा महिलांच्या व ग्रामस्थांच्या मागणीनुसार दारू बंदीचा ठराव होऊन देखील पोलीस प्रशासनाकडून निवेदनाला केराची टोपली दाखवली जात आहे. यामुळे ग्रामस्थांनी पुन्हा एकदा विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्याकडे दारू बंदीचे निवेदन देण्यात आले. आता विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी दिलेले आदेशाचे पोलिसांकडून पालन होते की पुन्हा त्यांनी दिलेल्या आदेशाला केराची टोपली दाखवली जाते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.