मुंबई -सर्वोच्च न्यायालयाने सत्तासंघर्षांवर निकाल दिल्यानंतर आता सरकारमधील सर्वच आमदारांना मंत्रिपदाचे वेध लागले आहेत. शिंदे फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होईल अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु असताना मंत्री पदासाठी पैसे मागितल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. मंत्रिपदासाठी भाजपच्या तब्बल चार आमदारांकडे पैशाची मागणी केली असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका मराठी वृत्त वाहिनीने याबाबतचे वृत्त प्रसारित केले आहे.
संबंधित भामट्याने फोन करून आमदारांना मंत्रीपद मिळेल असे सांगत कोट्यवधींची मागणी केल्याचे समोर आले. सदर भामट्याने आपण भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांचे स्वीय सहाय्यक असल्याचे सांगून आमदारांना मंत्रिपद देतो असं सांगत पैशांची मागणी केली. भाजपशी या भामट्याचा काहीही संबंध नसून तो केवळ नड्डा याचे नाव वापरत होता. यानंतर भामट्याला पोलिसांनी अटक देखील केली आहे.
कोणत्या आमदारांकडे केली मागणी
नागपुरातील भाजपचे आमदार विकास कुंभारे, भाजप आमदार टेकचंद सावरकर यांना काही दिवसांपूर्वी याबाबत फोन आला होता. फोन करणाऱ्याने आपले नाव निरज सिंह राठोड सांगत नड्डा यांचा स्वीय सहायक असल्याचे म्हंटले. तसेच मंत्रीपदासाठी पक्षनिधी म्हणून पावणेदोन कोटी रुपये देण्याची मागणी त्याने केली. यासह या भामट्याने आमदार तानाजी मुरकुटे आणि नारायण कुचे या आमदारांना देखील पैशाची मागणी केल्याचे समजते.
आमदारांना आला संशय
आमदार विकास कुंभारे यांना या प्रकरणात संशय आला.त्यांनी वरिष्ठांच्या कानावर ही बाब घातली. त्यानंतर रीतसर पोलिसात तक्रार देखील केली. अखेर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत निरज सिंह राठोड याला गुजरातच्या मोरबी, अहमदाबाद येथून अटक केली.