पुणे -मनपा मिळकतकर विभागाकडून 7 लाख 10 हजार बिले तयार करण्यात आलेली आहे. ती पुणेकरांना सोमवारपासून ऑनलाइन मिळणार आहेत. त्या आधारे कर भरता येणार आहे.
महापालिकेकडून दरवर्षी 1 एप्रिलपासूनच बिलांचे वाटप केले जाते. मात्र, शासनाकडून 40 टक्के सवलतीचा निर्णय एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात घेण्यात आल्याने पालिकेने बिले तयार केलेली नव्हती. परिणामी, यंदा बिले 15 मेपासून दिली जाणार आहेत.
तर, ज्या निवासी मिळकतींची नोंदणी 2019 नंतर झालेली आहे, तसेच “जीआयएस’ सर्व्हेक्षणात स्वत: घरमालक राहत नसल्याने पालिकेने 40 टक्के सवलत रद्द केलेल्या तसेच इतर जवळपास 1 लाख मिळकतींची बिले 31 मेपर्यंत दिली जाणार आहेत. अशा बिलांची संख्या सुमारे साडेचार लाख आहे.
जुने बिल दाखवूनही भरा कर
कर भरणा केंद्रात केवळ मिळकतीचा क्रमांक देऊन बिल जमा करता येणार आहे. त्यासाठी नागरिकांना नवीन बिलाची प्रत घेऊन जाण्याची गरज नाही. जुने बिल दाखवूनही नागरिक मिळकत क्रमांक देऊन बिल भरू शकणार आहेत. त्यामुळे कामकाजात सहजता येणार आहे.
यंदा 31 जुलैपर्यंत सवलत
दरवर्षी दरवर्षी 1 एप्रिल ते 31 मे या कालावधीत कर भरणाऱ्यांना सर्वसाधारण करात 10 ते 15 टक्के सवलत दिली जाते. मात्र, यावर्षी बिलेच 15 मेपासून देण्यात येणार असल्याने ही सवलत 15 जुलैपर्यंत असेल. ज्या नागरिकांना 31 मेपर्यंत बिले दिली जाणार आहेत, त्यांनाही सवलत 31 जुलैपर्यंत असेल.
ऑनलाइन मिळणार बिले
ई-मेल आयडी पालिकेकडे नोंद असलेल्या कर धारकांना ई-मेलद्वारे
बिल पाठवले जाणार
मोबाइल क्रमांक नोंद असलेल्या
कर धारकांना बिलाची लिंक
“एसएमएस’द्वारे मिळणार
संबंधित लिंकवर क्लिक करून बिल ओपन करून डाऊनलोड करता येणार
पालिकेच्या संकेतस्थळावर मिळकतकर विंडो ओपन करून मिळकतीचा क्रमांक टाकून बिल पाहता येणार
शनिवारी सायंकाळपर्यंत
7 लाख 10 हजार बिले तयार झाली आहेत. रविवारी रात्री उर्वरित बिले तयार होणार असून सोमवार पहाटेपासूनच ती नागरिकांना दिसतील, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे सोमवारपासून मिळकतकर भरता येईल.
– डॉ. अजित देशमुख,उपायुक्त, कर संकलन विभाग