पुणे – शहरातील सुमारे 45 किलोमीटरच्या विस्तारित मेट्रो प्रकल्पासाठी तब्बल 12 हजार 431 कोटींचा खर्च येणार आहे. या मार्गांत खडकवासला ते स्वारगेट आणि पुढे हडपसर, खराडीपर्यंत असेल. असून दुसरा मार्ग पौडफाटा ते वारजे माणिकबाग तसेच वनाज ते रामवाडी मार्गावरील वाघोली आणि चांदणी चौकापर्यंत असेल.
या विस्तारित मार्गांसाठी केंद्र आणि राज्यशासनाचा हिस्सा 40 ऐवजी आता 30 टक्केच दर्शविण्यात आल आहे. त्यामुळे महापालिकेवर 20 टक्के अतिरिक्त खर्चाचा बोजा येण्याची शक्यता आहे. मात्र, प्रस्तावात पालिकेकडून 10 टक्केच खर्च देण्याचे नमूद केले आहे. तर प्रकल्पासाठीचा कर्जाचा हिस्सा 50 टक्के वरून 60 टक्के दर्शविण्यात आला आहे. तर, हा मार्गही महामेट्रोच करणार असून महापालिकेने मान्यता दिल्यानंतर पुढील मान्यतांची प्रक्रिया महामेट्रोकडे देण्यात येणार आहे.
महापालिकेच्या प्रकल्प विभागाकडून हा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. वनाज ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली या मार्गांसाठी 3 हजार 357 कोटी तर खडकवासला ते स्वारगेट, हडपसर ते खराडी, पौडफाटा ते वारजे माणिकबाग या मार्गांसाठी 9 हजार 74 कोटींचा खर्च प्रस्तावित आहे.
केंद्र व राज्य सरकार या निधीतून तसेच “पीपीपी’च्या माध्यमातून या खर्चाचे नियोजन असणार असून महापालिकेचा आर्थिक हिस्सा हा जमिनींच्या माध्यमातून असणार आहे.
असे असतील विस्तारित मार्ग
1. खडकवासला-खराडी
(अंतर-कि.मी.)
स्वारगेट ते खडकवासला -13
स्वारगेट ते हडपसर-8
हडपसर ते खराडी-5
2. एसएनडीटी ते वारजे ते माणिकबाग – 7
3. वनाज ते रामवाडी विस्तारित
वनाज ते चांदणी चौक -1.5
रामवाडी ते वाघोली
(विठ्ठलवाडी ) – 11.5