पुणे – राज्यातील 147 कृषी उत्पन्न बाजार समितींसाठी शुक्रवारी मतदान पार पडले. यापैकी 37 बाजार समित्यांची मतमोजणी काल (शुक्रवारी) पार पडली. तर काही बाजार समित्यांचे निकाल आज जाहीर होणार आहेत. अनेक ठिकाणी मतमोजणीला सुरुवात झाली आहे. अनेक बाजार समित्यांमध्ये भाजप आणि शिवसेना विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना पाहायला मिळत आहे. त्यामुळे आजच या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
यानंतर आता पुणे जिल्ह्यातील प्रतिष्ठेच्या खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचा निकाल जाहीर झाला. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय झाला आहे. आमदार दिलीप मोहिते पाटील यांची प्रतिष्ठापणाला लागली होती. अखेर त्यांचा या निवडणुकीत विजय झाला आहे. सकाळासूनच मतदान केंद्रावर मतदारांची गर्दी झाली होती. मात्र मोहिते यांच्या विजयानंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे.
दरम्यान, बाजार समितीच्या निवडणुकीसाठी शुक्रवारीतब्बल 99 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. तालुक्यातील 7 ठिकाणी 17 मतदान केंद्रावर उत्साहात मतदान झाले. एकूण 3896 मतदारांपैकी 3839 मतदारांनी मतदान केले. या ठिकाणी राष्ट्रवादी विरूद्ध सर्व पक्षीय अशी लढत झाली. मात्र या निवडणुकीत सर्वांवर मात करत राष्ट्रवादीने बाजी मारली. यामध्ये राष्ट्रवादीला 10, ठाकरे गटाला 3, भाजपला 2, काँग्रेसला 1 जागेवर यश मिळाले आहे. व्यापारी मतदारसंघातील 2 अपक्ष उमेदवारही विजयी झाले आहेत.
भोर – काँग्रेस आमदार संग्राम थोपटेंचे वर्चस्व
पुण्याच्या भोर कृषी उत्पन्न बाजार समितीवर पुन्हा काँग्रेसचा विजय झाला आहे. भोर कृषी उत्पन्न बाजार समितीवर काँग्रेसने एकहाती सत्ता मिळवली आहे. काँग्रेस विरोधात सर्व पक्ष एकत्र लढल्यानंतरही 18 पैकी 18 जागांवर काँग्रेस विजयी झाली आहे. काँग्रेस आमदार संग्राम थोपटे यांनी हा गड राखला आहे. नया विजयानंतर गुलालाची उधळण करत काँग्रेस कार्यकर्त्यांकडून मोठ्या उत्साहात जल्लोष साजरा केला जात आहे.