Bihar Lok Sabha Election 2024 : देशात लोकसभा निवडणुकीच्या चार टप्प्यांसाठी मतदान झाले आहे. आता केवळ तीन टप्पे उरले असून, त्यात सर्वच राजकीय पक्षांनी आपली पूर्ण ताकद लावली आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेस आमदाराचा मुलगा आणि राज्याचे माजी प्रवक्ते यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
काँग्रेस नेते आणि महाराजगंजचे आमदार विजय शंकर दुबे यांचा मुलगा सत्यम दुबे यांनी गुरुवारी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्यासोबत काँग्रेसचे माजी प्रदेश प्रवक्ते असितनाथ तिवारी यांच्यासह अनेक काँग्रेसजनांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अनिल शर्मा यांनीही भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. पश्चिम चंपारण मतदारसंघातून तिकीट न मिळाल्याने नाराज असितनाथ तिवारी यांनी काँग्रेसचा राजीनामा दिल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच विजय शंकर दुबे हे देखील महाराजगंज जागेसाठी तिकीट मागत होते, मात्र काँग्रेसने त्यांना उमेदवारी दिली नाही, त्यामुळे सत्यम दुबे चांगलेच नाराज झाले होते.