रायबरेली – गांधी- नेहरू घराण्याचा बालेकिल्ला असलेल्या रायबरेली मतदारसंघात पुन्हा एकदा गांधी कुटुंब एकवटणार आहे. सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांची एक संयुक्त सभा घेतली जाण्याची तयारी आता केली जाते आहे.
समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादवही या सभेत सहभागी होणार आहेत. दोन दशके या मतदारसंघाचे नेतृत्व करणाऱ्या सोनिया गांधी रायबरेलीत दाखल झाल्या असून त्यांनी सक्रियताही वाढवली आहे.
उद्या दौऱ्याच्या पहिल्या दिवशी त्या स्थानिक कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असून त्यानंतर होणाऱ्या मोठ्या सभेत सहभागी होतील. शुक्रवारी दुपारी १ वाजता सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
सोनिया गांधी यांनी यंदाची लोकसभा निवडणूक न लढता राज्यसभेवर जाण्याचा निर्णय घेतला आणि त्या राजस्थानमधून राज्यसभेत दाखलही झाल्या आहेत. त्यानंतर त्यांचे पुत्र राहुल गांधी आता रायबरेली येथून रिंगणात आहेत. रायबरेली येथे २० तारखेला मतदान होणार आहे.