मुंबई – देशातील करोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून दिल्लीसह अनेक ठिकाणी करोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. करोना वाढता धोका टाळण्यासाठी महाराष्ट्र सरकारने वृद्ध नागरिकांना नाकावाटे इन्कोव्हॅक लस देण्याची मोहिम हाती घेतली आहे.
या मोहिमेला आजपासून सुरुवात झाली. मुंबई महानगरपालिकेच्या 24 वॉर्डांमधील निवडक केंद्रांवर इन्कोव्हॅक लस दिली जाणार आहे. लसीचे मोफत डोस केवळ ज्येष्ठ नागरिकांनाच उपलब्ध असतील, अशी माहिती मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
कोण घेऊ शकते ही लस…
महाराष्ट्र राज्य शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार आजपासून इन्कोव्हॅक ही लस 60 वर्षांवरील नागरिकांना देण्यात येणार आहे. कोविशिल्ड अथवा कोवॅक्सिनची दुसरा डोस घेतल्यानंतर सहा महिन्यांनी इन्कोव्हॅक लस घेता येईल. महत्त्वाचे म्हणजे, इतर कोणत्याही लसीची मात्र घेतलेल्या नागरिकांना ही लस घेता येणार नाही, असे महापालिका प्रशासनाने सांगितले आहे.
कुठे आणि कधी मिळणार लस…
मुंबई महानगरपालिकेच्या 24 वार्डमधील काही ठराविक ठिकाणी ही लस दिली जात आहे. प्रत्येक वॉर्डमध्ये एक लसीकरण केंद्र असेल. लसीकरण केंद्रावरच या नोंदणी केली जाईल. लसीकरण केंद्रे सकाळी 9:00 ते दुपारी 3:00 या वेळेत सुरू राहतील. इन्कोव्हॅक ही नाकातून दिली जाणारी जगातील पहिली करोना प्रतिबंधक लस आहे.