मुंबई – ट्विटरने अनेक दिग्गज मंडळींच्या अकाऊंटवरील ब्लू टिक काढून टाकले आहे. यात राजकीय नेते, खेळाडू, बॉलीवूड कलाकारांचा समावेश आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण, यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन ब्लू टिक हटवण्यात आली आहे. गुरुवारी मध्यरात्री या सर्व अकाऊंट्सवरून ब्लू टिक काढून टाकण्यात आले.
काय आहे यामागचं कारण ?
एलॉन मस्क यांनी काही दिवसांपूर्वी ट्विटरवरील ब्लू टिकसाठीही पैसे मोजण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यामुळे ब्लू टिक वापरण्यासाठी आता पैसे मोजावे लागणार आहे. त्याची अमंलबजावणी करण्यात आली आहे. एलॉन मस्क यांनी 20 एप्रिलपासून सर्व लेगसी अकाऊंटचे ब्लू टिक काढले जातील असे सांगितले होते. आता पैसे मोजून ब्लू टिक घेणाऱ्यांनाच या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. भारतात ट्विटर ब्लूचे सबस्क्रिप्शन 650 रुपयांपासून पासून सुरु होते. तर मोबाईल युझरसाठी दरमहा 900 रुपये शुल्क आहे.
ट्विटरची आधी पॉलिसी
यापूर्वी, ट्विटर राजकारणी, अभिनेते, पत्रकारांसह सेलिब्रिटींच्या अकाऊंटला ब्लू टिक देत असे. यासाठी कोणतंही शुल्क आकारलं जात नव्हते. सेलिब्रिटी मंडळी, राजकारणी, मोठमोठ्या कंपन्या, वृत्तसंस्था आणि इतर महत्त्वाच्या व्यक्तींचे अकाऊंट्स बनावट नसल्याचे ओळखू येण्यासाठी ब्लू टिकची सुविधा ट्विटरकडून सुरू करण्यात आली होती. त्यासाठी ट्विटरकडून क्षुल्लक आकारल जात नव्हते. आता मात्र ब्लू टिकसाठी सशुल्क सेवा करण्यात आली आहे.