पुणे – भाजप आमदार गोपीचंद पडळकर नेहमीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करत असतात. गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. एका कार्यक्रमात बोलतांना गोपीचंद पडळकर यांनी पवार नावाची कीड महाराष्ट्राला लागली आहे. असं म्हणत जहरी टीका केली आहे.
गोपीचंद पडळकर म्हणाले,’पवार नावाची कीड महाराष्ट्राला लागली आहे, ती मुळापासून काढून टाकावी लागेल,’ याच वक्तव्याच्या विरोधात आता राष्ट्रवादी पक्षातील नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली असून पोलीसांत तक्रार दाखल केली आहे. अशातच आता एका माजी सैनिकाच्या मुलानेदेखील गोपीचंद पडळकरांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे. तसेच पडळकरांविरोधात पुण्यात बॅनरदेखील लावले आहेत. माजी सैनिक सूर्यकांत लालाजी पवार यांचे पूत्र माधव उर्फ नितीन सूर्यकांत यांनी पुण्यात बॅनर लावले आहेत.
या बॅनरमध्ये पडळकरांच्या वक्तव्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. तसेच त्यांना एक सवालदेखील केला आहे. या बॅनरवर लिहिलं आहे की, ‘पवार म्हणजे महाराष्ट्राला लागलेली कीड? गोपीचंद पडळकरांचा निषेध…. माजी सैनिक सूर्यकांत लालाजी पवार यांनी भारतीय सैन्यात देशसेवा केली. १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धात ते सहभागी झाले होते. देशासाठी प्राण हातावर घेऊन लढणारे आम्ही पवार महाराष्ट्राला लागलेली कीड? आमदार गोपीचंद पडळकर आम्ही पवार कुटुंबीय तुम्हाला कधीच माफ करू शकणार नाही.” असेही ते म्हणाले आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी देखील पडळकरांच्या टीकेला ट्विट करत उत्तर दिले आहे.
अमोल मिटकरी यांचे ट्विट
हा गोप्या म्हणजे भट्टीच्या तव्यावर बसलेल्या बाबासारखा आहे.. पवारांचं नुसत नाव जरी ऐकलं की गोप्याच्या बुडाला आग लागली म्हणुन समजा… याला जास्त दिवस संन्यासी ठेवणे त्याच्या पक्षाला परवडणार नाही, हा त्याच्या पक्षाला एकदिवस आग लावून त्याच भट्टीवर बुड शेकत आनंद घेईल..
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) March 27, 2023