नवी दिल्ली – अमेरिकेतील कथित संशोधन संस्था हिंडेनबर्गचा अहवाल समोर आल्यापासून भारतातील गौतमी अदानी यांचा उद्योग समूह सातत्याने चर्चेत आहे. हिंडेनबर्गचा अहवाल एक महिन्यापूर्वी म्हणजे 24 जानेवारी रोजी उघड झाला होता. तेव्हापासून अदानी यांची घसरण सुरू आहे. हिंडेनबर्गने अदानी समूहावर फसवणूक आणि अफरातफरीचा आरोप केला. त्या दिवसापासून त्यांच्या कंपन्यांच्या शेअरचे मूल्य कोसळते आहे.
गुंतवणूकदारांमध्ये खळबळ माजलेलीच आहे व अजुनही वातावरण म्हणावे तसे शांत झालेले नाही. जगातल्या पहिल्या दहा श्रीमंतात स्थान पटकावणारे अदानी आता पहिल्या 25 जणांच्या यादीतूनही बाहेर पडले आहेत. रिपोर्ट अर्थात अहवाल जारी करताना हिंडेनबर्गने एक दावा केला होता. अदानींच्या कंपन्यांचे शेअर्स कुठपर्यंत कोसळू शकतील असे भाकित त्यात करण्यात आले होते.
आज स्थिती अगदी तशीच आहे जसे भाकित त्यांनी केले होते. एका प्रख्यात भारतीय माध्यमसमूहाने दिलेल्या माहितीनुसार अहवाल प्रसिध्द झाल्यापासून आजपर्यंत गौतम अदानी यांच्या संपत्तीत तब्बल 75 अब्ज डॉलरची घट झाली आहे. हा फार मोठा फटका आहे.
सुरूवातीला अदानी यांनी हा एक फार मोठा कट असल्याचा आरोप केला होता. त्यांनी राष्ट्रवादाशीही या मुद्द्याची सांगड घातली होती. तथापि, त्यातून त्यांना फार काही साध्य करता आलेले नाही. जसे भविष्य वर्तवले गेले आहे त्याच मार्गाने अदानींच्या कंपन्यांची वाटचाल आज सुरू असल्याचे दिसून येते. अदानी टोटल गॅस, अदानी ग्रीन एनर्जी आणि अदानी ट्रान्समिशन्सच्या शेअर्सना सर्वाधिक फटका बसला आहे.
अदानी टोटल गॅसचे तब्बल 3.44 लाख कोटींचे जबर नुकसान झाले आहे. 24 जानेवारीनंतर त्याची सातत्याने घसरण सुरू आहे. अदानी ट्रान्समिशनचे 2.28 लाख कोटी तर अदानी ग्रीन एनर्जीचे 2.26 लाख कोटींचे नुकसान झाले आहे.