मुंबई – शिवसेनेचे मुख्य नेते म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावावर मंगळवारी रात्री शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यांच्याकडे पक्षाचे सर्वांधिकार देण्यात आले आहेत. दरम्यान, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे असणारे पक्षप्रमुखपद शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत रद्द होण्याचे संकेत मिळत आहेत.
केंद्रीय निवडणूक आयोगाने नुकताच शिंदे गटाला खरी शिवसेना ठरवणारा निर्णय दिला. त्या पक्षाचे धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटालाच बहाल करण्यात आले. आयोगाच्या त्या निर्णयानंतर शिंदे यांनी प्रथमच शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलावली. त्या बैठकीत शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करण्यात आला.
ज्येष्ठ नेते रामदास कदम यांचे पुत्र सिद्धेश यांच्यावर शिवसेनेच्या सचिवपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्याशिवाय, पक्षाच्या शिस्तपालनाची निश्चिती करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली. त्या समितीच्या सदस्यांमध्ये दादा भुसे, शंभुराज देसाई आणि संजय मोरे यांचा समावेश आहे. पक्षविरोधी कार्य करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा अधिकार त्या समितीकडे असेल.
कार्यकारिणी बैठकीत शिवसेनेची पुढील भूमिका, उद्दिष्टे आदींवर प्रकाश टाकणारे काही ठराव मंजूर करण्यात आले. राज्यातील भूमिपुत्रांना नोकऱ्यांमध्ये 80 टक्के स्थान, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न यांसारखी पक्षाची उद्दिष्टे आहेत. त्याशिवाय, यूपीएससी आणि एमपीएससी उमेदवारांना भक्कम पाठिंबा देण्याची ग्वाही पक्षाने दिली आहे.