रायपूर (छत्तीसगड) – छत्तीसगड राज्याला कॉंग्रेस पक्षाच्या 85 व्या पूर्ण अधिवेशनाचे यजमानपद दिल्याबद्दल त्या राज्याचे मुख्यमंत्री भुपेश बघेल यांनी कॉंग्रेस श्रेष्ठींचे आभार मानले आहेत. ते म्हणाले की तीन दिवसांच्या पूर्ण अधिवेशनासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. त्याची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे.
मंत्री आणि प्रतिनिधींसाठी सर्व व्यवस्था सुरू आहे. आम्हांला यजमानपदाची संधी दिल्याबद्दल मी पक्षाच्या हायकमांडचा आभारी आहे. हे अधिवेशन 24 फेब्रुवारीपासून सुरू होणार असून या अधिवेशनात पंधरा हजार प्रतिनिधींना आमंत्रित करण्यात आले आहे.
पुढील वर्षी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी रणनिती तयार करण्यावर या अधिवेशनातील प्रामुख्याने चर्चा होणार आहे. या कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री रविवारी रायपूर येथील राज मैदानावर दाखल झाले. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, आमची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे.
प्रसारमाध्यमांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. आम्ही कार्यक्रमात जेवण आणि स्वयंपाक घराची सुसज्ज सोयही केली आहे. स्वतंत्र बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. विविध राज्यांमधून येणाऱ्या पक्षाच्या सदस्यांसाठी आम्ही प्रवेश द्वारावरच माहिती देण्याचे काम करणार आहोत. हे अधिवेशन 26 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे.