पुणे – शिंदे गटाच्या शिवसेनेचे 2024 निवडणुकीच्या दृष्टीने रोडमॅप तयार आहे. त्यामुळे त्याची काळजी करण्याचे कारण नाही. त्यामुळे आम्हाला कमी लेखण्याचा प्रयत्न करू नका, अशा शब्दांत सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी भूमिका स्पष्ट केली.
जिल्हा परिषदेच्या कार्यक्रमानंतर सावंत यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
वाढत्या संपर्काच्या चर्चेवरून अजित पवार व भाजप एकत्र आल्यास शिंदे गटाचे काय अस्तित्व असेल, यावर बोलताना सावंत म्हणाले, आमचे अस्तिव कसे असेल, याबाबत काहीच चिंता करण्यासारखे नाही. बाजार समितीच्या निवडणुकीबाबत ते म्हणाले, कृषी उत्पन्न बाजार समितीवर त्यांची सत्ता गेल्या 20 व 25 वर्षांपासून आहे. त्यामुळे त्यांचे वर्चस्व दिसत असले तरी आम्ही शिरकाव केला आहे. काही ठिकाणी विजय मिळविला आहे. यावरून सत्तेचे समितीकरण ठरविणे चुकीचे आहे. कारण ग्रामपंचायत, बाजार समितीच्या निवडणुका वेगळ्या असतात. त्यावरून निष्कर्ष काढणे योग्य होणार नाही.
दरम्यान, करोनाच्या काळात आणि आताही आरोग्य विभाग उत्तमप्रकारे काम करत आहे. त्यात कर्मचाऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी पाऊल टाकले आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या तक्रारीसाठी समिती नेमण्यात आली आहे. एक-एक करीत सर्व प्रश्न मार्गी लावू, असेही सावंत म्हणाले.