नवी दिल्ली – छत्तीसगड मधील कॉंग्रेस यंत्रणा पक्षाच्या महाअधिवेशनाच्या तयारीत व्यस्त असतानाच अंमलबजावणी संचालनालयाने सोमवारी छत्तीसगडमधील अनेक कॉंग्रेस नेत्यांवर छापे टाकले आहेत. कोळसा लेव्ही मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाच्या चालू तपासाचा भाग म्हणून, अधिकाऱ्यांनी हे छापे टाकल्याचे सांगण्यात येत आहे.
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, भिलाई (दुर्ग जिल्हा) येथील आमदार देवेंद्र यादव, छत्तीसगड प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे खजिनदार रामगोपाल अग्रवाल, छत्तीसगड स्टेट बिल्डिंग आणि इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाचे अध्यक्ष रामगोपाल अग्रवाल यांच्याशी संबंधीत ठिकाणांवर आज पहाटेपासून छापा सुरू आहे.कॉंग्रेसच्या अन्य नेत्यांवरही हे छापे टाकले गेले आहेत.
छाप्यांवरून भाजपवर निशाणा साधत प्रदेश कॉंग्रेसचे प्रसिद्धी प्रमुख सुशील आनंद शुक्ला म्हणाले, रायपूर येथे होणाऱ्या कॉंग्रेसच्या अधिवेशनाची भाजपला भीती वाटत आहे आणि त्यात अडथळा आणण्यासाठी त्यांनी अशा प्रकारचा खटाटोप चालवला आहे.
जेव्हा जेव्हा भाजप आपल्या राजकीय प्रतिस्पर्ध्यांचा सामना करण्यात अपयशी ठरतो तेव्हा ते ईडी आणि सीबीआयसारख्या केंद्रीय संस्थांचा गैरवापर करतात असा दावा त्यांनी केला. या छाप्यांचा निषेध म्हणून कॉंग्रेसने रायपूर येथील ईडी कार्यालयाला घेराव घालण्याचा इशारा दिला आहे.