पुणे – महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती असून, संपूर्ण राज्यात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. आज राज्यभरात छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंती उत्सव साजरा करण्यात येत आहे.
छत्रपतींची जन्मभूमी असलेल्या किल्ले शिवनेरीवरही मोठ्या प्रमाणात शासकीय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून, महाराष्ट्राच्या आराध्य दैवताला नमन करण्यासाठी लाखो शिवप्रेमी आज शिवनेरीवर दाखल झाले आहेत.
दरम्यान, आजच्या या दिमाखदार सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा या उपस्थिती होती. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बाळ शिवाजींना पाळण्यात घालण्यात आले. देवेंद्र फडणवीस सुद्धा याठिकाणी उपस्थित होते.
नऊवारी नेसलेल्या कलाकारांनी यावेळी शिवरायांचा पाळणा गायला. यावेळी संपूर्ण शिवनेरीवर आनंदाचे वातावरण दिसून आले. स्वतः राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून या शिवजन्मोत्सव सोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत.