मंडी – हिमाचलप्रदेशात मंडी येथे आंतरराष्ट्रीय महाशिवरात्र महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. सात दिवस चालणाऱ्या या महोत्सवाचे उद्घाटन उद्या मुख्यमंत्री सुखविंदरसिंग सुखु हे करणार आहेत. या भागातील 215 देवस्थानांचा हा एकत्रित उत्सव आहे. उत्सवाच्या पहिल्या दिवशी सर्व देवतांची एकत्रित मिरवणूक काढली जाणार आहे. त्यानंतर महोत्सवातील सहाही दिवशी रात्री सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.
या कार्यक्रमासाठी देशविदेशातून भाविक व पर्यटक येथे येणार आहेत. दहा वर्षांच्या अवधीनंतर येथे हा महोत्सव होत आहे. त्यासाठी संपुर्ण मंडी शहर सजवण्यात आले आहे. येथे या महोत्सवानिमीत्त चोख बंदोबस्तही तैनात केला गेला असून चौदाशे पोलिस कर्मचारी येथे बंदोबस्ताला तैनात करण्यात आले आहेत अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.