पुणे – कसबा पेठ व चिंचवड पोटनिवडणुकीसाठी मतदान केंद्राध्यक्ष तसेच पथकातील इतर अधिकाऱ्यांची संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून दुसरे रॅंडमायझेशन निवडणूक निरीक्षक नीरज सेमवाल, एस. सत्यनारायण आणि जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालय येथे करण्यात आली. रॅंडमायझेशन वेळी प्रशिक्षित मनुष्यबळातून मतदान पथके तयार करुन त्यांना संगणकीय प्रणालीने विधानसभा मतदार संघ नेमून देण्यात आले.
चिंचवड विधानसभा मतदार संघात 510 मतदान केंद्रे व कसबा पेठ विधानसभा मतदार संघात 270 मतदान केंद्रे याप्रमाणे 780 मतदान केंद्रे आहेत. त्या व्यतिरिक्त निवडणूक प्रक्रियेमध्ये नियमानुसार 10 टक्के राखीव मनुष्यबळाची तरतूद करणे आवश्यक असते. त्यानुसार अधिकाऱ्यांच्या पहिल्या रॅंडमायझेशन वेळी निवडणूक प्रकियेसाठी सर्व मनुष्यबळाची निवड करुन त्यांना प्रशिक्षण देण्यात आले.
चिंचवड मतदार संघासाठी याप्रमाणे 561 मतदान पथके आणि कसबा पेठ मतदार संघासाठी 297 पथके अशी एकूण 858 पथके करण्यात आली आहेत. या अधिकाऱ्यांमध्ये 858 मतदान केंद्राध्यक्ष, 858 मतदान अधिकारी- एक, इतर मतदान अधिकारी 858 पुरुष व 858 महिला याप्रमाणे पथके तयार करण्यात आली आहेत, अशी माहिती उप जिल्हा निवडणूक अधिकारी आरती भोसले यांनी दिली.
निरीक्षकांना प्रशिक्षण
चिंचवड आणि कसबा पेठ विधानसभा मतदार संघातील संवेदनशील मतदान केंद्रांसाठी नेमलेल्या सूक्ष्म निरीक्षकांचे प्रशिक्षण बुधवार दि.15फेब्रुवारी रोजी जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत आयोजित करण्यात आले आहे. चिंचवड विधानसभा मतदार संघात 13 संवेदनशील मतदान केंद्रे आणि कसबा पेठ विधानसभा मतदार संघात 9 संवेदनशील मतदान केंद्रे आहेत. या मतदान केंद्रांच्या अनुषंगाने घ्यावयाची विशेष काळजी, सादर करायचे अहवाल आदींच्या अनुषंगाने प्रशिक्षण यावेळी देण्यात येणार आहे.