मुंबई : राजकीय वर्तुळावून एक मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा अखेर मंजूर झाला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांचा राजीनामा मंजूर केला आहे. याबाबतची माहिती राष्ट्रपती भवनाकडून देण्यात आली आहे. महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून रमेश बैस यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
Ramesh Bais appointed as the new Governor of Maharashtra; President of India has accepted the resignation of Bhagat Singh Koshyari as Governor of Maharashtra. pic.twitter.com/9mco3tSTkI
— ANI (@ANI) February 12, 2023
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशातील १३ राज्यपाल आणि उपराज्यपाल यांची बदली केली आहे. त्यामध्ये महाराष्ट्राच्या राज्यपालांचाही समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा १९ जानेवारी रोजी मुंबई दौरा संपन्न झाला होता. या दौऱ्यानंतर राज्यपाल भवनाने एक प्रसिद्धीपत्रक जाहीर केले होते. त्यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आपले मनोगत व्यक्त केले होते. “महाराष्ट्रासारख्या संत, समाजसुधारक आणि शूरवीरांच्या महान भूमीचा राज्यसेवक, राज्यपाल होण्याचा बहुमान मिळणे हे माझ्याकरिता अहोभाग्य होते.
गेल्या तीन वर्षांहून अधिक काळ राज्यातील जनसामान्यांकडून मिळालेले प्रेम आणि आपुलकी कधीही विसरता येणार नाही. माननीय पंतप्रधानांच्या नुकत्याच झालेल्या मुंबई दौऱ्यात आपण राजकीय जबाबदाऱ्यांमधून मुक्त होऊन जीवनातील उर्वरित काळ अध्ययन, मनन व चिंतनात व्यतीत करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. माननीय पंतप्रधानांचा विशेष स्नेह आपणास नेहमीच लाभत आला आहे, आणि आशा आहे की या संदर्भात देखील मला त्यांचा आशिर्वाद मिळत राहील,” असे राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या मनोगतामध्ये म्हटले होते.