नागपूर – रवीचंद्रन अश्विनच्या गोलंदाजीचा धसका घेतलेल्या ऑस्ट्रेलियाला गुरुवारपासून सुरु झालेल्या भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीत सपशेल अपयश आले. खरेतर अश्विनपेक्षा कसोटी संघात पुनरागमन केलेल्या रवींद्र जडेजाने चकवले. त्याने पाच फलंदाज बाद करत त्यांचे कंबरडेच मोडून टाकले. त्यांचा पहिला डाव अवघ्या 177 धावांवर संपूष्टात आला. पहिल्या दिवसअखेर आपल्या पहिल्या डावात भारताने 1 गडी गमावून 77 धावा केल्या असून ते अद्याप 100 धावांनी पिछाडीवर आहेत.
चौथ्या दिवशी दुसऱ्या डावात फलंदाजी करायला लागू नये असा ग्रह केलेल्या ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकत पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, भारताच्या गोलंदाजांनी त्याचा हा निर्णय साफ चुकीचा ठरवला. वेगवान गोलंदाज महंमद शमी व महंमद सिराज यांनी दोन्ही सलामीवरांना बाद करत थाटात प्रारंभ केला त्यावेळी ऑस्ट्रेलियाच्या अवघ्या 2 धावा झाल्या होत्या. या धक्क्यातून ते अखेरपर्यंत सावरूच शकले नाहीत.
या जोडीची गोलंदाजी थांबवत कर्णधार रोहित शर्माने जडेजाच्या हाती चेंडू सोपवला व त्याने ऑस्ट्रेलियाच्या भक्कम फलंदाजीची वाताहत केली. त्याच्या जोडीला अश्विननेही त्यांच्या कसलेल्या फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. जडेजाने 5 तर अश्विनने 3 गडी बाद केले. जामठाच्या या मैदानाची खेळपट्टी पहिल्या दिवसापासूनच फिरकी गोलंदाजीला साथ देताना दिसली. मात्र, मार्नस लेबुशेन, स्टिव्हन स्मिथ, पीटर हॅण्डस्कोम्ब व ऍलेक्स कॅरी यांनी तढल देण्याचा प्रयत्न केला. लेबुशेनचे अर्धशतक अवघ्या एका धावेने हुकले. स्मिथ 37, हॅण्डस्कोम्ब 31 तर तळात कॅरीने 36 धावा केल्या व संघाला दीडशतकी मजल मारुन दिली. त्यांचा पहिला डाव 63.5 षटकांत 177 धावांवर संपला.
भारताने कर्णधार रोहित शर्माने लोकेश राहुल याच नियमित सलामीवीरासह डाव सुरु केला. यावेळी राहुल काहीसा गोंधळलेला दिसत होता मात्र, रोहितने पहिल्याच षटकांत पॅट कमिन्सवर हल्ला केला व थाटात प्रारंभ केला. यानंतर नाथन लॉयन व टॉड मर्फी या फिरकी गोलंदाजांवरही त्याने आक्रमक फलंदाजी करत हल्ला चढवला. त्यामुळेच त्यांची दीशा व टप्पाही चुकला.
Stumps on Day 1️⃣ of the first #INDvAUS Test!#TeamIndia finish the day with 77/1, trailing by 100 runs after dismissing Australia for 177 👌🏻
We will see you tomorrow for Day 2 action!
Scorecard – https://t.co/edMqDi4dkU #INDvAUS | @mastercardindia pic.twitter.com/yTEuMvzDng
— BCCI (@BCCI) February 9, 2023
दरम्यान मर्फिने राहुलला 20 धावांवर बाद केले. मात्र, त्यापूर्वी या जोडीने संघाला अर्धशतकी सलामी दिली. राहुल परतल्यावर पहिल्या दिवसातील उर्वरीत खेळात अश्विनने संयम दाखवत ऑस्ट्रेलियाला आणखी यश मिळू दिले नाही. रोहितने मोठ्या कालावधीनंतर अर्धशतक साकार केले. त्याने आपल्या नाबाद 56 धावांच्या खेळीत 69 चेंडूत 9 चौकार व 1 षटकार अशी आतषबाजी केली. अश्विनला अद्याप खाते उघडायचे आहे. भारत अद्याप 100 धावांची पिछाडीवर आहे.