नागपूर – कर्णधार रोहित शर्माचे शतक तर रवींद्र जडेजा व अक्सर पटेल यांच्या अर्धशतकी खेळी केली. त्यांच्या या कामगिरीच्या जोरावर यजमान भारतीय संघाने बॉर्डर-गावसर करंडक कसोटी मालिकेतील पहिल्या कसोटीत आपल्या पहिल्या डावात दुसऱ्या दिवसअखेर शुक्रवारी 7 गडी गमावून 321 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 177 धावांवर रोखल्यावर भारतीय संघाने वर्चस्व राखले व सामन्यावर पकड घेतली.
गुरूवारच्या 1 बाद 77 धावांवरून पुढे खेळ सुरु झाल्यावर रोहितने रवीचंद्रन अश्विनच्या साथीत संघाचे शतक फलकावर लावले. अश्विन टॉम मर्फीने बाद केले. त्यानेच लोकेश राहुलला बाद केले होते. त्याच्या गोलंदाजीवर भारताच्या प्रमुख फलंदाजंनी सपशेल नांगी टाकली. अश्विन बाद झाल्यावर आलेल्या चेतेश्वर पुजाराने चौकार फटकावताना सुरूवात धडाक्यात केली मात्र, अवघ्या 7 धावांवर त्याला मर्फीनेच तंबूचा रस्ता दाखवला. यावेळी रोहितने आपले अर्धशतक पूर्ण केले. मग खेळपट्टीवर विराट कोहली आला व त्याने रोहितला साथ देताना संघाचे दीडशतक फलकावर लावले.
दरम्यान रोहितने आपल्या कसोटी शतकाला गवसणी घातली. कोहली संयमी फलंदाजी करताना विनाकारण लेग साइडचा चेंडू फटकावण्याच्या प्रयत्नात मर्फीच्याच गोलंदाजीवर 12 धावांवर परतला. पाठोपाठ पदार्पणवीर धडाकेबाज फलंदाज सूर्यकुमार यादवनेही निराशा केली. यावेळी भारताची स्थिती 5 बाद 168 अशी बनली. त्याचवेळी जडेजाने रोहितला सुरेख साथ दिली. जडेजाने रोहितसह संघाचे द्विशतक फलकावर लावले. रोहितचा शतक पार केल्यावर संयम सुटला व तो वेगाने धावा करण्याच्या प्रयत्नात 120 धावांवर बाद झाला. त्याने या खेळीत 212 चेंडूंचा सामना करताना 15 चौकार व 2 षटकार फटकावले.
कसोटी पदार्पण केलेल्या यष्टीरक्षक फलंदाज श्रीकर भरतनेही निराशा केली. तो 8 धावांवर बाद झाला. त्यानंतर मात्र जडेजाने अक्सर पटेलच्या साथीत दिवसातील जास्तीत जास्त षटके खेळून काढताना संघाचे आणखी नुकसान होऊ दिले नाही व डावाला बळकटीही प्राप्त करुन दिली. जडेजा व पटेल यांनी आपापली अर्धशतके पूर्ण करताना संघाचे त्रिशतक फलकावर लावले. जडेजाने नाबाद 66 धावांच्या खेळीत तब्बल 170 चेंडूंचा सामना करताना 4 चौकार मारले. पटेलने नाबाद 52 धावांची खेळी करताना 102 चेंडूत 8 चौकार फटकावले.
आता भारतीय संघाकडे 144 धावांची आघाडी आहे. या जोडीने आठव्या गड्यासठी अखंडीत 81 धावांची भागीदारी केली आहे. आता सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतीय संघ ही आघाडी कीती वाढवतो व ऑस्ट्रेलियाचे फलंदाज दुसऱ्या डावात कशी फलंदाजी करतात याकडे लक्ष लागले आहे. पहिल्या डावाप्रमाणेच ते याही डावात अपयशी ठरले तर सामन्याचा निकाल तिसऱ्याच दिवशीही लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. ऑस्ट्रेलियाकडून पदार्पणवीर टॉम मर्फीने 5 गडी बाद केले. नाथन लियॉन व पॅट कमिन्स यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.