पिंपरी, दि. 7 – चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक 2023 च्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालय येथे माध्यम कक्ष तर मतदारांच्या अडचणी सोडवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील बी विंगमधील चौथ्या मजल्यावर उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयात जिल्हा नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला आहे.
माध्यम कक्षाद्वारे निवडणूकीच्या अनुषंगाने वृत्तपत्र, इलेक्ट्रॉनिक माध्यमे, समाज माध्यमे आदींवरील निवडणूक विषयक वृत्त, मजकुराचे अवलोकन करण्यात येत आहे.
नियंत्रण कक्षाचा दूरध्वनी क्रमांक 020-26134478 असा आहे. नवीन मतदान ओळखपत्र, ओळखपत्रात दुरुस्ती, मतदान यादीत नाव नोंदणी, ऑनलाइन पद्धतीने ओळखपत्र काढताना येणाऱ्या अडचणींबाबत या कक्षाद्वारे मार्गदर्शन करण्यात येते. आलेल्या तक्रारी दूर करण्यासाठी संबंधित निवडणूक कार्यालयाला कळवले जाते. पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यापासून आतापर्यंत 75 तक्रारींची नोंद झाली आहे, अशी माहिती समन्वय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी सचिन इथापे यांनी दिली.