पिंपरी, दि. 7 -चिंचवड स्टेशन आणि नाशिक फाटा येथील एसटीच्या स्थानकावरुनच बेकायदेशीर प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांकडून प्रवासी पळविले जात आअहेत. याचा राज्य मार्ग परिवहन महामंडळाला मोठा फटका बसत आहे. येथे सक्रिय असलेले दलाल प्रवासी आल्याबरोबर त्यांच्या मागे लागतात आणि त्यांनी नेऊन खासगी मोटारीमध्ये बसवितात. विशेष म्हणजे वाहतूक पोलीस जवळपास असताना हा प्रकार सर्रास सुरू असतो.
एसटी महामंडळामार्फत पुणे-मुंबई, पनवेल या भागात होणाऱ्या प्रवासी वाहतुकीला जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर चिंचवड स्टेशन येथे आणि महामार्गावर हिंजवडी येथे अधिकृत थांबा देण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांना रात्री उशिरापर्यंत ये-जा करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. मात्र; या दोन्ही ठिकाणच्या थांब्यांना बेकायदेशीर प्रवासी वाहतुकीचा विळखा पडला आहे.
सुरुवातीला अवैध प्रवासी वाहतुकीची वाहने एसटीच्या अधिकृत थांब्यापासून काही अंतरावर उभी केली जात असायची. आता मात्र या व्यावसायिकांचे धाडस वाढले असून, थेट एसटीच्या थांब्यानजीकच वाहने उभी करुन, प्रवाशांना प्रवास भाड्याची माहिती देत , खासगी वाहनातून प्रवास करण्याची गळ घातली जात आहे. त्याकरिता पिंपरी-चिंचवडसह मुंबईतील चालक प्रवाशांना कमालीचा आग्रह करताना दिसत आहेत.
अवैध प्रवासी वाहतुकीचा तुलनेत कमी खर्चाचा पर्याय उपलब्ध झाल्याने, अनेक प्रवासी खासगी वाहनातील प्रवासाला पसंती देत आहेत. मात्र; प्रवासी वाहतूक होणाऱ्या खासगी वाहनाला झालेल्या अपघातामध्ये आतापर्यंत अनेक जणांना प्राण गमवावे लागले आहेत.
एसटी महामंडळाच्या पुणे-नाशिक मार्गावर होणाऱ्या प्रवासी वाहतुकीला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. याठिकाणी प्रवाशांना बसण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, याठिकाणी देखील अवैध प्रवासी वाहतुदारांकडून एसटीचे प्रवासी पळविले जात आहेत. याचा मोठा आर्थिक फटका एसटी महामंडळाला बसतआहे.