BJP NCP ALLIANCE – राजकारणात काहीही शक्य असतं, आजचे वैरी जर उद्या मांडीला-मांडी लावून बसले तर त्यात काही नवल नाही असं आपण अनेकदा ऐकलं असेल. मागील काळात देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांचा पहाटेचा शपथविधी असो वा राष्ट्रवादी व काँग्रेसशी टोकाचे मतभेद असलेल्या शिवसेनेचा महाविकास आघाडीचा प्रयोग असो राजकीय नेतेमंडळी सत्तेची चावी स्वतःकडे ठेवण्यासाठी अशी अवघड गणितं जुळवून आणण्यात तरबेज असतात. असाच एक प्रयोग झालाय देवगड अर्बन बँक निवडणूकीत. येथे भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येत शिवसेना-काँग्रेसच्या पॅनलला पराभवाची धूळ चारली आहे.
देवगड अर्बन बँक निवडणुकीमध्ये भाजप व राष्ट्रवादीने एकत्र येत शिवम पॅनलच्या माध्यमातून निवडणूक लढवली होती. तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व काँग्रेसने सहकार समृद्धी पॅनल या निवडणुकीच्या रिंगणात उतरवला होता. रविवारी (२९ जानेवारी) मतदान पार पडले. या निवडणुकीमध्ये एकूण ११५४३ सभासद मतदारांपैकी ३३४७ मतदारांनी मतदानादाचा हक्क बजावला. निवडणुकीचा निकाल आज जाहीर करण्यात आला असून यामध्ये भाजप व राष्ट्रवादीच्या शिवम पॅनलचा दणदणीत विजय झाला आहे. भाजप – राष्ट्रवादीने येथे विरोधकांचा १३-० असा धुव्वा उडवला आहे.
दरम्यान, भारतीय जनता पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसने देवगड अर्बन बँक निवडणुकीमध्ये युती करत मैदान मारल्यानंतर भाजप आमदार मनितेश राणे यांनी ट्विट करत विजयी सदस्यांचे अभिनंदन केले आहे.
देवगड अर्बन बँक निवडणूकीत भाजप- राष्ट्रवादीचे शिवम पॅनेलच १३/० निर्विवाद वर्चस्व@BJP4Maharashtra@cbawankule@Dev_Fadnavis pic.twitter.com/rJ5vyeHvxM
— nitesh rane (@NiteshNRane) January 31, 2023
भाजप राष्ट्रवादीचा घरोबा । BJP NCP ALLIANCE
देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांचा पहाटेच्या शपथविधीचा प्रयत्न फसला होता. भाजप नेते फडणवीस व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पवार यांचे ते सरकार राज्याच्या इतिहासातील सर्वात कमी काळ टिकलेले सरकार ठरले होते. हा विषय मागे पडला असला तरी आजही यावरून भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकमेकांना चिमटे काढताना दिसतात. अशातच आता स्थानिक पातळीवर का होईना भाजप व राष्ट्रवादीचा पुन्हा एकदा घरोबा झाल्याचं पाहायला मिळालं आहे.