लाहोर – पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तेहरिक ए इन्साफ पक्षाचे प्रमुख इम्रान खान हे पाकिस्तानच्या संसदेतील 33 जागांसाठी निवडणूक लढवणार आहेत. येत्या मार्च महिन्यात पाकिस्तानमध्ये होणाऱ्या संसदेच्या पोटनिवडणुकीत ते 33 जागांवर उभे राहणार आहेत, असे “पीटीआय’ पक्षाचे उपाध्यक्ष आणि माजी परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी रविवारी संध्याकाळी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
इम्रान खान यांच्याच अध्यक्षतेखाली लाहोरमधील झमान पार्क येथे झालेल्या पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. संसदेच्या 33 जागांवर “पीटीआय’ पक्षाचे इम्रान खान हे एकमेव उमेदवार उभे असणार आहेत, असे कुरेशी म्हणाले.
पाकिस्तानच्या निवडणुक आयोगाने संसदेच्या 33 जागांच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम शुक्रवारी जाहीर केला. या पोटनिवडणुका 16 मार्चला होणार आहेत. इम्रान खान यांना एप्रिल महिन्यात अविश्वास ठरावाच्या आधारे हटवण्यात आल्यानंतर त्यांच्या “पीटीआय’ पक्षाच्या सदस्यांनी संसदेच्या कनिष्ठ सभागृहातील सदस्यत्वाचे राजीनामे दिले आहेत.
गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये ,सभापतींनी “पीटीआय’च्या 11 सदस्यांचे राजीनामे स्विकारल्यानंतर इम्रान खान यांनी संसदेच्या 8 जागांवर निवडणूक लढवली होती. त्यापैकी 6 जागांवर ते विजयी झाले होते. “पाकिस्तान डेमोक्रॅटिक मुव्हमेंट’ जर अबाधित राहिली, तर इम्रान खान सर्व जागांवर विजयी होऊ शकतात. पोटनिवडणुकीतील 33 पैकी 12 जागा पंजाब प्रांतातील, 8 खैबर पख्तुन्वा प्रांतातील, 3 इस्लामाबादेतील, 9 सिंध प्रांतातील आणि 1 जागा बलुचिस्तानातील आहे.
Snowfall : उदयपूरमध्ये झाली बर्फवृष्टी! गारपिटीने पिके उध्वस्त; शेतकरी हतबल
“पीटीआय’चे सर्व सदस्य संसदेच्या बाहेर असतील
गेल्या महिन्यात सभापतींनी “पीटीआय’च्या 35 सदस्यांचे राजीनामे स्विकारले. त्यानंतर सभापतींनी “पीटीआय’च्या आणखीन 35 सदस्यांचे राजीनामे स्विकारले. तर पंतप्रधान शेहबाझ शरीफ यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणण्यासाठी उर्वरित 43 राजीनामे मागे घेण्याचा निर्णय इम्रान खान यांनी केला. मात्र निवडणूक आयोगाने या 43 सदस्यांचे सदस्यांना अपात्र ठरवले तर “पीटीआय’ पक्षाचे सर्व सदस्य संसदेच्या बाहेर असतील.