पुणे – स्वातंत्र्यलढ्यामध्ये योगदान असणाऱ्या महापुरुषांना मानवी प्रतिकृतीद्वारे मानवंदना देण्यात आली. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून झील एज्युकेशन सोसायटीच्या विद्यार्थ्यांनी हा उपक्रम राबवला.
संस्थेचे सचिव जयेश काटकर यांच्या हस्ते ध्वजारोहण आणि दीपप्रज्वलनाने उपक्रमाला सुरूवात झाली. झील एज्युकेशन सोसायटी नेहमीच नावीन्यपूर्ण उपक्रमांना प्राधान्य देते, मागील तीन वर्षापासून हा उपक्रम आयोजित करतात. यंदाही संस्थेच्या मैदानात 3 हजार 700 हून अधिक विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झाले असून, “एकता आणि शांतता’ हा संदेश आपल्या देशाच्या युवा पिढी पर्यंत पोहोचवण्याचा उद्देश या उपक्रमातून सफल झाला आहे. 500 हून अधिक स्वयंसेवकांनी गेल्या एक महिन्यापासून हा उपक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले. या उपक्रमामध्ये राष्ट्रध्वज, नेताजी सुभाषचंद्र बोस, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मौलाना अबुल कलाम आझाद, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक व राष्ट्रपिता महात्मा गांधी या महापुरुषांची मानवी प्रतिकृती साकारून मानवंदना दिली गेली. संस्थेचे संस्थापक संभाजी काटकर, उद्धव शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटचे प्रमुख प्रा. डॉ. ऋषिकेश काकांडीकर, प्राचार्य अयूब तांबोळी, डॉ. अजित काटे, प्रा. नीलेश मगर, प्रा. विजय शिंदे यांनी कार्यक्रम यशस्वी केला.