पिंपरी – चाकण येथे राज्य कामगार विमा महामंडळाच्या माध्यमातून रुग्णालये उभारण्यात येणार असून त्यासाठी तातडीने शासकीय जमीन उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत झालेल्या बैठकीत दिले आहेत. गेल्या वर्षी या रुग्णालयाला शासन स्तरावर मान्यता मिळाली असली, तरीदेखील जागाच उपलब्ध नसल्याने या रुग्णालयाच्या बांधकामाला नेमकी केव्हा सुरुवात होईल, असा प्रश्न कामगार वर्गाला पडला आहे.
केंद्रीय कामगार विभागामार्फत महाराष्ट्रात राज्य कामगार विमा महामंडळाचे रुग्णालय सुरू करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली. यावेळी पर्यावरण, वने व कामगार मंत्री भूपेंद्र यादव, राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, कामगार मंत्री सुरेश खाडे, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, कामगार विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर, वन विभागाचे प्रधान सचिव वेणूगोपाल रेड्डी, पर्यावरण विभागाचे सचिव प्रवीण दराडे, आरोग्य विभागाचे सचिव नवीन सोना, कामगार आयुक्त सुरेश जाधव आदी उपस्थित होते.
चाकण, पालघर, सातारा, पेण, पनवेल, जळगाव येथे 1100 खाटांचे रुग्णालय तयार करण्यात येणार असून त्यासाठी शासकीय जमीन उपलब्ध करून देण्याबाबत तसेच काही ठिकाणी उच्चदाब वीज वाहिनी दूर करण्याबाबत चर्चा झाली. या रुग्णालयांसाठी तातडीने जमीन उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्त्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिले. जिल्ह्यातील चाकण येथील औद्योगिक वसाहतीमध्ये अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांचे उत्पादन प्रकल्प आहेत. नव्याने विकसित झालेल्या या वसाहतीमध्ये हजारो कंपन्यांमधून लाखो कामगारांना रोजगार उपलब्ध झाला आहे. या उत्पादन प्रकल्पांमधील बहुतांशी कामगार राज्य कामगार विमा महामंडळाचे लाभार्थी आहेत. मात्र, याठिकाणी महामंडळाचे रुग्णालय नसल्याने या कामगारांना वैद्यकीय उपचार अथवा वैद्यकीय समस्येकरिता पुण्यातील बिबवेवाडी अथवा चिंचवडमधील इएसआय रुग्णालयात धाव घ्यावी लागते. चाकण ते पुणे अथवा चिंचवड येथे जाण्यासाठी पदरमोड व वेळेचा अपव्यय होत असल्याने कामगारांमध्ये नाराजी आहे.
दरम्यान, चाकण औद्योगिक वसाहतीचा वाढता विस्तार लक्षात घेता, याठिकाणी ईएसआय रुग्णालय सुरु करण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला आहे. याठिकाणी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल प्रस्तावित आहे. मात्र, या रुग्णालयाकरिता काही एकरांमध्ये लागणारी जागाच उपलब्ध नसल्याने शासन पातळीवर होणाऱ्या बैठकांमध्ये केवळ रुग्णालय उभारणीच्या घोषणा केल्या जात आहेत.
कार्यालय सुरू :
रुग्णालय केव्हा ?
ईएसआय योजना लाभार्थी कामगारांची नोंद व इतर सुविधा उपलब्ध करुन घेण्याकरिता भोसरीतील कार्यालयात जावे लागत असायचे. मात्र, काही दिवसांपूर्वीच ईएसआयचे कार्यालय चाकणमध्ये सुरु करण्यात आले आहे. आता रुग्णालय केव्हा बांधणार ? असा सवाल कामगार व कामगार संघटना करत आहेत.