सातारा – खटाव तालुक्यातील पाच, पाटण व सातारा तालुक्यातील प्रत्येकी दोन अशा इंग्रजी माध्यमांच्या नऊ शाळा अनाधिकृत असल्याचे शिक्षण विभागाच्या तपासणीत दिसून आले आहे. या शाळा तात्काळ बंद करण्याबाबत संबधित शाळांना शिक्षण विभागाकडून नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. शाळा तात्काळ बंद करण्याबाबत नोटीसा असून न केल्यास दंडात्मक कारवाई व प्रसंगी फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशारा प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी शबनम मुजावर यांनी दिला आहे.
शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी नुकतीच सातारा जिल्हा परिषदेस भेट देवून शिक्षण विभागाचा आढावा घेतला होता. यावेळी अनधिकृत शाळा बंद करण्यासाठी ठोस पाऊले उचलण्याबाबत त्यांनी सूचना केल्या होत्या. पुणे जिल्ह्यातील अनधिकृत शाळांवर काही दिवसांपूर्वी कारवाई करण्यात आली आहे.
सातारा जिल्ह्यातही इंग्रजी माध्यमाच्या अनधिकृत शाळांना शिक्षण विभागाने नोटीसा दिल्या आहेत. सातारा तालुक्यातील अजिंक्य डि. वाय. पाटील इंटरनॅशनल स्कूल मोळाचा ओढा, टॅलेन्ट स्कूल गोजेगाव, खटाव तालुक्यातील बचपन ई मिडीयम स्कूल वडूज, पोदार माय लर्न स्कूल वडूज, ट्रिनिटी इंग्लिश मिडीयम स्कूल सातेवाडी, पवार पब्लिक स्कूल पुसेसावळी, सनशाईन स्कूल खटाव आणि पाटण तालुक्यातील लिटील जल इंग्लिश स्कूल चाफळ, नॅशनल गुरुकूल स्कूल चाफळ या शाळांना शिक्षण विभागाने नोटीसा पाठविल्या असल्याचे शबनम मुजावर यांनी सांगितले. कोणतीही शाळा संबंधित शासन अथवा स्थानिक प्राधिकरणाच्या परवानगी अथवा
मान्यता प्रमाणपत्राशिवाय सुरु करता येत नाही. नियमात अशी तरतूद असतानाही त्याकडे दुर्लक्ष करुन शाळा सुरु ठेवल्यास संबधितांना एक लाख रुपये दंड व त्यानंतरही शाळा सुरु ठेवल्यास प्रत्येक दिवशी दहा हजार रुपये दंडाची तरतूद आहे. या शाळा तात्काळ बंद न केल्यास शाळा व्यवस्थापनाविरोधीत फौजदारी गुन्हा दाखल करण्याची तरतूद आहे. त्यानुसार प्रसंगी पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे मुजावर यांनी सांगितले.