मुंबई – देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 19 जानेवारीला म्हणजेच आज मुंबई दौऱ्यावर येणार आहे. राज्यातील सत्ता संघर्षानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मुंबईत येत आहे. या दौऱ्यापूर्वी पंतप्रधान कर्नाटकात असणार आहेत. त्यामुळे पंतप्रधान कर्नाटकातून मुंबईत येणार आहेत. त्यावरून आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. कर्नाटकातून येत आहेत तर तिथल्या मुख्यमंत्र्यांना सूचना देऊन या,मराठी बांधवांवर अत्याचार करू नका,असे सांगून या असं आवाहनचं राऊत यांनी केलं आहे.
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद तापलेला असताना पंतप्रधान कर्नाटकातून येणार असल्यामुळे त्यांनी येताना कर्नाटच्या मुख्यमंत्र्यांना सूचना देऊन याव्यात अशी मागणी राऊत यांनी केली आहे. माध्यमांशी बोलताना राऊत यांनी पंतप्रधानांच्या मुंबई दौऱ्यावर भाष्य केले.बेळगावातील मराठी बांधवांवर अत्याचार करू नका अशा सूचना मी पंतप्रधान म्हणून कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना दिल्या आहेत असं मोदींनी मुंबईत सांगावं,आम्हाला आनंद होईल असाही राऊत यावेळी म्हणालेत.
नरेंद्र मोदी मुंबईतील विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार असून मेट्रो 2 A आणि मेट्रो 7 चे लोकार्पण करणार आहेत. गुरुवारी सायंकाळी 6:30 वाजता मेट्रो 2 A आणि मेट्रो 7 च्या विस्तारित मार्गिकांचे लोकार्पण होणार आहे.मोदींच्या स्वागतासाठी मुंबई आणि प्रदेश भाजपने जोरदार तयारी केली आहे. यावेळी मोदी काय बोलतात याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे.