शिवसेना पक्ष व धनुष्यबाण चिन्हावर हक्क कोणाचा यावर निवडणूक आयोग आजही तोडगा काढू शकलेला नाही. याबाबत ठाकरे व शिंदे गटाने आज निवडणूक आयोगाच्या दरबारी जोरदार युक्तिवाद केल्यानंतर सुनावणीसाठी पुढील तारीख देण्यात आली आहे. निवडणूक आयोग शिवसेना पक्ष व धनुष्यबाण चिन्हावर दोन्ही गटांनी सांगितलेल्या दाव्यांवर शुक्रवारी (२० जानेवारी) पुढील सुनावणी घेणार आहे.
ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल तर शिंदे गटाकडून महेश जेठमलानी बाजू मांडत आहेत. दोन्ही बाजूंकडून आज निवडणूक आयोगासमोर जोरदार युक्तिवाद करण्यात आला. सिब्बल यांनी, निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणाबाबत निर्णय लागल्यानंतर आपला निर्णय द्यावा अशी आग्रही बाजू मांडली. तर दुसरीकडे जेठमलानी यांनी, शिंदे गटाकडे आमदार व खासदारांचे बहुमत असल्याने अपात्रतेचा मुद्दा ग्राह्य नसल्याचे म्हंटले. तसेच लवकरात लवकर निर्णय देण्यात यावा अशी मागणीही करण्यात आली.
दरम्यान, निवडणूक आयोग शिवसेना व धनुष्यबाणावर हक्क कोणाचा याबाबत आज निर्णय देईल असे कयास बांधण्यात आले होते. मात्र आयोगाने आज पुन्हा एकदा दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकून घेत सुनावणीसाठी पुढील तारीख दिली आहे. आता शुक्रवारी होणाऱ्या सुनावणीमध्ये अयोग्य निर्णय देणार की ठाकरे गटाची सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर निकाल देण्याची विनंती मान्य करणार हे शुक्रवारीच कळेल.
तत्पूर्वी, आज झालेल्या सुनावणीत ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी, शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे बोगस कागदपत्रे दाखल केल्याचा गंभीर आरोप केला. आमदार, खासदार सोडून गेले असले तरी पक्षावर त्याचा काहीही परिणाम झाला नसल्याचीही बाजू त्यांनी मांडली. सिब्बल यांच्या या युक्तिवादाला शिंदे गटाचे वकील जेठमलानी यांनी जोरदार विरोध केला.
आज निवडणूक येथील कार्यालयात पार पडलेल्या या सुनावणीसाठी ठाकरे गटाकडून अनिल परब व अनिल देसाई हे नेते उपस्थित होते. तर शिंदे गटाकडून खासदार राहुल शेवाळे हे उपस्थित होते. शिंदे गटाने राहुल शेवाळे यांना लोकसभेतील गटनेता जाहीर केलं आहे. शिंदे गटाकडून आज प्रथमच कोणी बडा नेता सुनावणीसाठी हजार राहिला होता. शेवाळेंच्या उपस्थितीमुळे आजच निकाल लागणार या चर्चांना काही वेळासाठी हवा मिळाली होती.