मुंबई : आगामी निवडणुकांत शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र येऊन महाविकास आघाडीत वंचित सामील होणार, याची दिशा ठरवणारी बैठक सोमवारी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात पार पडली. या बैठकीत आगामी महापालिकेत युती करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली असली तरी वंचित बहुजन आघाडीकडून आपल्या अटी- शर्तीवरच युती होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, या युतीबाबत आता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाकडून पहिली प्रतिक्रिया देण्यात आली आहे.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) अध्यक्ष रामदास आठवले यांनी याविषयी प्रतिक्रिया दिली आहे. याविषयी बोलताना आठवले यांनी,”शिवशक्ती आणि भीमशक्ती असं म्हणत उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर एकत्र येताय. मात्र ती भीमशक्ती नसून वंचितशक्ती आहे. कारण भीमशक्ती माझ्यासोबत आहे, असे सांगितले. शिवशक्ती आणि भीमशक्ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत असल्याचेही रामदास आठवले यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच प्रकाश आंबेडकर जरी उद्धव ठाकरेंसोबत गेले, तरी आमच्या राजकारणात याचा काहीही फरक पडणार नाही, असा दावाही रामदास आठवले यांनी यावेळी केला.
पुढे बोलताना आठवले यांनी, ‘२०११ रोजी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना भेटल्यानंतर त्यांनी माझ्यासमोर शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र येणं अत्यंत आवश्यक आहे, असा प्रस्ताव ठेवला होता. त्यावेळी मी बाबासाहेब आंबेडकर यांचा विरोधक नाही. माझे बाबा प्रबोधनकार ठाकरे हे त्यांचे खूप चांगले मित्र होते. माझ्याबद्दल गैरसमज निर्माण करण्यात आला आहे, असं बाळासाहेब म्हणाले होते. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल मला प्रचंड आदर आणि प्रेम आहे. त्यामुळे शिवशक्ती आणि भीमशक्ती महाराष्ट्रात एकत्र आली पाहिजे. त्याशिवाय राज्यात सत्ता मिळणं अशक्य आहे. त्यामुळे याचा विचार करा, अशा पद्धतीचा प्रस्ताव बाळासाहेब ठाकरे यांनी माझ्यासमोर ठेवला होता, असे देखील रामदास आठवले यांनी म्हटले आहे.
बाळासाहेबांनी माझ्यासमोर शिवशक्ती आणि भीमशक्तीचा प्रस्ताव ठेवल्यानंतर मी जवळपास ८-९ महिने महाराष्ट्रातल्या विचारवंतांशी, साहित्यकांशी, कार्यकर्त्यांसोबत चर्चा केली. सर्वांनी मला हेच सांगितले की, राजकारणामध्ये असे धाडसी निर्णय घ्यायचे असतात. तरी वैचारिक काही मतभेद असले, तरी समाजाला न्याय देण्यासाठी युती करण्यास हरकत नाही, असे सगळ्यांनी सांगितल्याचे रामदास आठवलेंनी सांगितले.