पुणे (विजयकुमार कुलकर्णी) -पारंपरिकपेक्षा “1121′ या प्रजातीच्या बासमती तांदळाची सध्या बाजारात चलती आहे. आकाराने लांब आणि शिजल्यानंतर सुटसुटीत तसेच फुलणाऱ्या या तांदळाला देश, परदेशांतून जास्त मागणी आहे. पीक लवकर येत असल्याने शेतकरीही त्याची लागवड करण्यास पसंती देत आहेत. परिणामी, पारंपरिक तांदळाची लागवड घटली आहे.
सध्या, बाजारात 90 टक्के “1121′ आणि इतर हायब्रीड तांदूळ विकला जात आहे. तर केवळ 10 टक्के पारंपारिक बासमतीची विक्री होते. पारंपरिक तांदूळ एक किलो शिजविल्यानंतर अडीच किलो भात होतो, तोच अधिक फुगत असल्याने “1121′ शिजवल्यानंतर साडेतीन किलो भात होतो. त्यामुळे हॉटेल व्यावसायिक, केटरर्स, पुरवठादार आणि चायनीज रेस्टॉरंटकडून या तांदळाला मोठी मागणी असल्याचे तांदळाचे व्यापारी राजेश शहा यांनी सांगितले.
केवळ घरगुती तसेच चवीला प्राधान्य देणाऱ्यांकडूनच अद्यापही पारंपरिक बासमतीची खरेदी करण्यात येत आहे. साधारणत: आठ वर्षांपूर्वी शहरासह देशातील बाजारपेठांमध्ये अखंड पारंपरिक बासमतीसह तुकड्यालाही मोठ्या प्रमाणात मागणी होती. मात्र, ती आता लक्षणीय घटली आहे. पारंपरिकचे पीक आल्यानंतर ते चार-सहा महिने जुने झाल्यानंतर वापरावे लागते. तर, “1121 स्टीम’ प्रक्रिया केल्यानंतर लगेच वापरता येतो. दोन्हींनाही बाजारात जवळपास सारखाच भाव मिळतो. बासमती तांदळाचा घाऊक बाजारातील किलोचा भाव 120 रुपये आहे. तर 1121 ला 115 रुपये भाव मिळत आहे. 1121चे पीक हाती येण्यास पारंपरिकपेक्षा महिनाभर कमी कालावधी लागतो. त्यामुळे शेतकरी 1121 बासमतीला प्राधान्य देत आहेत. लावत आहेत.
पारंपरिक बासमतीपेक्षा “1121 प्रजाती’च्या बासमतीला जास्त मागणी आहे. देशात तर जास्त विक्री होतच. परदेशातूनही या तांदळाच मागणी आहे. भारतातून 2021-22 या वर्षामध्ये 50 लाख टन बासमती तांदळाची निर्यात झाली आहे. त्यापैकी तब्बल 45 लाख टन 1121 बासमती आणि काही प्रमाणात हायब्रिड बासमती आहे. देशासह जगातील बाजारात 1121 प्रजातीच्या तांदळाची चलती आहे.
– राजेश शहा, तांदळाचे व्यापारी आणि निर्यातदार