नागपूर – नागपूर शहरात अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने गुरुवारी सकाळपासून 7 ठिकाणी छापेमारी केली. ही कारवाई नागपुरातील सुपारी व्यापाऱ्यांवर केल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. या छापेमारीमुळे नागपुरसह मध्य भारतातील व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
आसाम पोलिसांनी सुपारीकिंग छटवाल यांना अटक केल्याच्या वृत्तानंतर प्रकाश गोयल, आसिफ कलीवाला, दिग्विजय ट्रान्सपोर्टचे हिमांशु भद्रा आदींवरही छापे मारल्याने सुपारी व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
छापेमारी केलेले सर्व व्यापारी परदेशातून सुपारी आयात करणारे आहेत. यापूर्वीही ते वेगवेगळ्या तपास यंत्रणांच्या रडारवर आलेले आहेत. छापेमारी करत असलेल्या ईडीच्या पथकात मुंबई आणि अन्य शहरातील अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या छापेमारीची बातमी वाऱ्याच्या वेगाने शहरात पसरल्याने इतर सुपारी व्यापारी सावध झाले. यापूर्वी सीबीआयनेही धाडी घालून अवैध व्यापारावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला होता.