पिंपरी, दि. 1 – गेली 50 वर्षे करत असलेल्या कथक नृत्य साधनेचे हे फळ असून त्याची शासन दरबारी नोंद होणे माझ्यासाठी अभिमानास्पद आहे, असे मत यमुनानगर, निगडी येथील कथक नर्तक डॉ. पं. नंदकिशोर कपोते यांनी व्यक्त केले.
डॉ. पं. नंदकिशोर कपोते यांना भारत सरकारचा संगीत नाटक अकादमीचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. त्या वेळी त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. डॉ. कपोते यांना कथक नृत्यातील सर्वांगीण योगदानाबद्दल हा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. राष्ट्रपतींच्या हस्ते दिल्ली येथे हा पुरस्कार देण्यात येणार आहे. डॉ. पं. नंदकिशोर कपोते हे भारत सरकारचा संगीत नाटक अकादमी राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारे पिंपरी-चिंचवड शहरातील एकमेव पहिले कलाकार आहेत.
डॉ. कपोते म्हणाले की, हा पुरस्कार म्हणजे माझे आई-वडिल विमल आणि भास्कर कपोते तसेच माझे गुरू पद्मविभूषण पं. बिरजू महाराज यांचा आशीर्वाद आहे. बिरजू महाराज यांनी सांगितले होते की, तू महाराष्ट्रात जाऊन माझ्या कलेचा प्रचार व प्रसार कर. तसेच “जब तक तुम्हारे पैरो मे घुंगरू है, तब तक मै तुम्हारे साथ हीँ,’ असा त्यांनी मंत्र दिला होता. त्यानुसार ही मी अखंड नृत्याची साधना करत आहे.
डॉ. पं. नंदकिशोर कपोते यांना महाराष्ट्र शासनाचा राज्य सांस्कृतिक पुरस्कार 2004 मध्ये, महाराष्ट्र शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र पुरस्कार 2010 मध्ये प्रदान करण्यात आलेला आहे. तसेच त्यांना भारत सरकारने सिनीयर फेलोशिप देऊन सन्मानित केले आहे. डॉ. नंदकिशोर कपोते हे कथक नृत्यात पीएच. डी. मिळवणारे महाराष्ट्रातील पहिले कथक नर्तक आहेत. ते पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील स्कूल ऑफ लिबरल आर्टसचे संचालक म्हणून सध्या कार्यरत आहेत.