पुणे – ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे 77 व्या वर्षी निधन झाले. गेली 15 दिवसांपासून त्यांच्यावर पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु होते. अखेर आज शनिवार (दि. 26) उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या निधनाने मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे. पुण्यातील बालगंधर्वमध्ये अंत्यदर्शनासाठी त्यांचे पार्थिव ठेवण्यात आले असून वैकुंठ स्मशानभूमीत आज संध्याकाळी अंत्यसंस्कार होणार आहेत.
गोखले यांच्या निधनानंतर देशभरातून शोक व्यक्त केला जात आहे. अभिनेते शरद पोंक्षे यांनी शोक व्यक्त करताना म्हंटले की, फार मोठा आधार माझ्या आयुष्यातला गेला. ज्यांच्याकडे बघत मी अभिनय शिकलो. या क्षेत्रात कसे वागावे हे शिकलो. आपल्या मतांवर ठाम कसे राहावे हे शिकलो. असा माझा सर्वच बाबतीतला तो गुरू होता. माझ्या आजारपणात भेटायला येऊन मला आधार देऊन गेले. काही दिवसांपूर्वी माझ्याच बाजूच्या सेट वर शुटींग करत होते.
जायचे प्रत्येकालाच आहे. परंतु एक छान कारकीर्द करून जावे. दुःख तर खूप आहेच. खऱ्या अर्थाने रंगभूमीवरचा केवळ दिसायलाच नाहीतर अभिनयातही देखणा कलाकार गेला. स्टेजवर कसे काम करावे, कसे बोलावे, कसे वावरावे हे शिकवणारा अफाट अभिनेता होता तो. माझ्या आयुष्यातली ही पोकळी कधीच भरून न निघणारी आहे. माझा पहिला गुरू यशवंत दत्त गेला आणि हा दुसरा गुरूही गेला.
विक्रम गोखले हे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या भावे स्कूलचे ( आताची म.ए.सो. मुलांचे विद्यालय) माजी विद्यार्थी होते. त्यांनी अनेक मराठी, हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. सर्वांच्या आवडीचे ते कलाकार होते.