मुंबई : आयपीएलच्या ८७ जागांसाठी झालेल्या आयपीएल २०२३ चा मिनी लिलाव शुक्रवारी कोचिनमध्ये संपन्न झाला. या लिलावात तब्बल ४०५ खेळाडूंनी सहभाग नोंदवला. सर्व १० फ्रँचायझी संघांबरोबरच चाहते आणि क्रिकेटपटूही आयपीएलच्या या मिनी लिलावाची आतुरतेने वाट पाहत होते. यात चेन्नई सुपर किंग्ज या संघाने क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेला ५० लाखांना खरेदी केले. यावरुन अभिनेते शरद पोंक्षे यांनी संताप व्यक्त केला आहे.
शरद पोंक्षे यांनी नुकतेच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी एका प्रसारमाध्यमावर टीका केली आहे. एका मराठी वृत्तवाहिनीने अजिंक्य रहाणेला चेन्नई सुपर किंग्ज या संघाने ५० लाखांना विकत घेतलं अशी बातमी दिली होती. त्याचा एक स्क्रिनशॉट शेअर करत शरद पोंक्षेंनी संताप व्यक्त केला आहे.
विकत घ्यायला ती वस्तू आहे का? ही दळीद्री पत्रकारीता. त्या खेळाडूच ते मानधन आहे. ते अशा विकृत पध्दतीने जाहीर करायला लाज कशी वाटत नाही?, असे त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.
दळीद्री पत्रकारीता.विकत घ्यायला ती वस्तू आहे का? तो खेळाडू आहे त्याच ते मानधन आहे.लाज कशी वाटत नाही? अशी बातमी देताना? आणि हा चौथा स्तंभ pic.twitter.com/rGc9kkzijN
— SHARAD PONKSHE (@ponkshes) December 23, 2022
शरद पोंक्षेच्या या पोस्टनंतर अनेकांनी त्यावर कमेंट केली आहे. “दुर्दैव आहे, पण खेळाचा धंदा झाल्यावर हीच भाषा असणार सर.. कोट्ट्यावधी पैशांची देवाण घेवाण एवढच नजरेने काही लोक क्रिकेटकडे पाहतात. दुःख आहे”, अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली आहे. तर एकाने “एकदम बरोबर बोललात सर आपण. ही बातमी वाचल्यावर खरच हा विचार मनामध्ये आला. बातमी लिहीणाऱ्यांना आपण कोणाबद्दल लिहीत आहोत हे तरी कळायला हवे”, असे म्हटले आहे.