पिंपरी, दि. 26 – पिंपरी चिंचवड शहर हे उद्योगनगरी म्हणून ओळखले जाते. या उद्योगनगरीत मोठ्या प्रमाणावर लहान-मोठे उद्योग सुरू आहेत. परंतु अनेक वाहनचालक आपल्या क्षमतेपेक्षा जास्त मालाची वाहतूक करतात. याकडे वाहतूक विभागाचे दुर्लक्ष होत आहे. धोकादायक वाहतुकीचा एक प्रकारे नागरिकांच्या जिवाशी खेळ सुरू आहे. त्यामुळे अशा पद्धतीने वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
चिखली-आकुर्डी मार्गावर स्पाइन रोड येथे भाजीमंडई चौकात एक टेम्पो बांधकामासाठी स्टिल घेऊन जाताना गतिरोधकावर मागच्या चेसीमधून लोखंडी बार रस्त्यात कोसळले. त्यामुळे टेम्पोच्या पाठीमागील वाहनचालकांना अपघाता धोका निर्माण झाला होता. परंतु या अपघातामध्ये जीवितहानी झाली नाही. चिखली-आकुर्डी मार्ग मुळातच अरुंद आहे. या मार्गावर मोठ्या प्रमाणावर दिवसरात्र वाहतूक सुरू असते. त्यात भाजीमंडई चौकात सिग्नल व्यवस्था आहे. या ठिकाणी वाहने झ्रेबा क्रॉसिंगजवळ उभा राहतात त्याच ठिकाणी गतिरोधक उभारला आहे. तसेच स्ट्रॉर्म वॉटर लाइन देखील येथून गेली आहे. त्यामुळे येथे अवजड वाहतूक करणाऱ्या वाहनांना झोला बसत आहे. त्यामुळे क्षमतेपेक्षा अधिक वाहतूक करणाऱ्या वाहनांमधून साहित्य खाली पडण्याच्या घटना घडत आहेत. या चौकातून निगडी, चिखली, आकुर्डी व भोसरीकडे जाणाऱ्या वाहनांची मोठी वर्दळ असते. सकाळी व सायंकाळी तर येथे हातगाडी, पथारीवाले तसेच टेम्पोत भाजीविक्री करणारे आणि रिक्षावाले मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण करतात. परंतु येथील वाहतूक नियंत्रण करण्यासाठी वाहतूक विभागाकडून वाहतूक पोलीस नियुक्त करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे या परिसरातून राजरोसपणे अशा प्रकारे अवैध वाहतूक सुरू आहे. त्यामुळे या चौकात वाहतूक पोलीस नियुक्त करून अवैध वाहतूक व अतिक्रमणाला आळा घालावा, अशी मागणी नगारिकांकडून होत आहे.
रस्त्यावरच अतिक्रमण
साने चौक ते भाजीमंडई चौकादरम्यान मोठ्या प्रमाणावर वाहनचालक व व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण केले आहे. चिखलीकडे आणि आकुर्डीकडे जाणाऱ्या दोन्ही मार्गावर हातगाडीवाल्यांनी अतिक्रमण केले आहे. तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या व्यावसायिकांकडे येणाऱ्या ग्राहकांसाठी पार्किंग व्यवस्था नसल्याने प्रत्येक नागरिक आपले वाहन रस्त्यात पार्क करू जात आहे. त्यामुळे अरुंद रस्त्यातून मार्ग काढताना येथे कायम वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे