पुणे, दि. 20 -शहरात रात्री उशिरापर्यंत मोठ-मोठ्या आवाजात साऊंड सिस्टीम वाजविणाऱ्या हॉटेल आणि पबविरुद्ध सामाजिक सुरक्षा विभागाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. नियमबाह्य पद्धतीने रात्री दहानंतर हॉटेलमधील मोठ्या आवाजातील साऊंड सिस्टीम सुरू ठेवल्याप्रकरणी कोरेगाव पार्कमधील कोरा कॉकटेल बार ऍण्ड किचन हॉटेलवर कारवाई केली. तेथून पावणेदोन लाखांचे साऊंड सिस्टीम जप्त करून ध्वनी प्रदूषण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील हॉटेल, पब, बारमध्ये रात्री उशीरपर्यंत नियमबाह्य पद्धतीने साऊंड सिस्टीम सुरू राहत असल्याच्या तक्रारी गुन्हे शाखेकडे येत आहेत. या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाकडून शहरात गस्त वाढविण्यात आली आहे. या दरम्यान कोरेगाव पार्कमधील हॉटेल कोरो कॉकटेल बार ऍण्ड किचन या ठिकाणी मोठ्या आवाजात साऊंड सुरू असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानंतर पथकाने प्रत्यक्ष पाहणी केली असता रात्री दहानंतर नियमबाह्य पद्धतीने साऊंड सुरू असल्याचे आढळून आले. यानुसार पोलिसांनी येथील 1 लाख 80 हजारांचा साऊंड जप्त केले आहेत. तर, संबंधित अस्थापनावर पर्यावरण संरक्षण कायदा 1986 अंतर्गत ध्वनी प्रदूषण अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ निरीक्षक विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक अनिकेत पोटे, आश्विनी पाटील, कर्मचारी प्रमोद मोहिते, अजय राणे, हणमंत कांबळे, पुष्पेंद्र चव्हाण यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.