मॅक्सिको – उत्तर अमेरिकेतील मेक्सिकोमध्ये भीषण अपघाताची घटना घडली आहे. एका भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रेन आणि ऑईल ट्रकची धडक झाली. यावेळी ऑईल ट्रक पलटी होऊन भीषण आग लागली. या घटनेत ट्रेन पूर्णपणे जळून खाक झाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी संबंधित ट्रक चालकाला अटक केली आहे.
मेक्सिकोच्या अगुआस्कॅलिएंट्स शहरात ही घटना घडली आहे. रेल्वे क्रॉसिंगजवळ मालवाहू ट्रेनची ट्रकला जोरदार धडक बसली, यावेळी ट्रकमध्ये ऑईल होते. यावेळी रेल्वेच्या धडकेत ट्रक पलटी होऊन पेटला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. आगीचे स्वरुप भीषण असल्याने आग विझवण्यासाठी सुमारे 200 अग्निशमन दल पाठवण्यात आले होते.
यामुळे जवळपासच्या काही घरांचेही मोठे नुकसान झाले आहे. याठिकाणी राहणाऱ्या 12 जणांची सुटका करण्यात आली आहे. यातील अनेक जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळाजवळ राहणाऱ्या सुमारे 1500 लोकांनाही सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.